ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यात २५०० महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:15+5:302021-01-08T06:12:15+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत महिला उमेदवारांसाठी ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व जागांवर महिलांमधून उमेदवारी अर्ज दाखल झालेले ...
ग्रामपंचायत निवडणुकीत महिला उमेदवारांसाठी ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व जागांवर महिलांमधून उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातूनही महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकूण महिला उमेदवारांचा आकडा ६० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर जैन येथे १७६ सदस्यांसाठी निवडणूक होत असून, त्याठिकाणी २५ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्या तुलनेत पुरुष उमेदवारांची संख्या मात्र केवळ १७ आहे. जिल्ह्यातील इतरही निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये थोड्याफार फरकाने हीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती - १६३
प्रभाग - ५५०
एकूण उमेदवार - ४२५६
महिला उमेदवार - २५५३
.....................
तालुकानिहाय महिला उमेदवारांची संख्या
वाशिम - ४५०
मालेगाव - ३५८
रिसोड - ५५०
मंगरूळपीर - ४६१
कारंजा - ४३०
मानोरा - ३०३
....................
महिलांसाठी आरक्षित जागा किती?
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित आहेत. ठराविक तितक्या जागांवर महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यासह सर्वसाधारण जागांवरही महिला उमेदवारांनी मोठ्या संख्येत अर्ज दाखल केल्यामुळेच एकूण महिला उमेदवारांचा आकडा हा ६० टक्क्यांवर गेला आहे.
....................
सर्वाधिक महिला उमेदवार कोणत्या तालुक्यात?
वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसोड तालुक्यात यंदा सर्वाधिक ३४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. ३३४ सदस्यसंख्या निवडीसाठी येत्या १५ जानेवारीला होत असलेल्या मतदान प्रक्रियेपूर्वी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यासाठी एकूण ९४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, निम्यापेक्षा अधिक संख्या महिला उमेदवारांची आहे.