सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांसाठी २६५ प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 12:28 PM2021-06-27T12:28:14+5:302021-06-27T12:28:58+5:30
Washim News : प्रस्तावांची छाननी करून विभागीय शिक्षण मंडळाकडे २५ जूनपूर्वी प्रस्ताव सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण देण्यासाठी २१ जून या अंतिम मुदतीपर्यंत २६५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून विभागीय शिक्षण मंडळाकडे २५ जूनपूर्वी प्रस्ताव सादर करण्यात आले.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांना कामगिरी पाहून सवलतीचे क्रीडा गुण दिले जातात. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्रच सुरू झालेले नसल्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांच्या खेळामध्ये सहभागी होऊ शकलेला नाही. त्यामुळे सन २०२१-२२ या वर्षात दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता ८ वी आणि ९ वी मध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यास सन २०२०-२१ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत तसेच सन २०२०-२१ या वर्षात इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता १२ वी पूर्वी इयत्ता ११ वीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा सहभाग विचारात घेण्यात येणार आहे.
सन २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे अनुक्रमे इयत्ता ८ वी ते ९ वी मधील खेळाच्या प्रावीण्य प्रमाणपत्राच्या प्रती मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याद्वारे साक्षांकित करून प्रस्ताव दोन प्रतींत २१ जून २०२१ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम येथे मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील २६५ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
सवलतीच्या गुणांसाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून २५ जूनपूर्वी विभागीय शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव सादर केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)