वाशिम जिल्ह्यात २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त!
By admin | Published: January 29, 2017 02:45 AM2017-01-29T02:45:42+5:302017-01-29T02:45:42+5:30
‘जलयुक्त शिवार’चा सकारात्मक परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी.
सुनील काकडे
वाशिम, दि. २८ जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे जिल्ह्यातील २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त होणार आहेत. या योजनेच्या सकारात्मक परिणामामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी झाला आहे.
'पाणी अडवा-पाणी जिरवा', या संकल्पनेचा मूळ उद्देश डोळ्यासमोर सन २0१९ पर्यंत संपूर्ण राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २0१५-१६ या सत्रापासून राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील २00 गावांचा यामध्ये समावेश झाला होता. वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ आणि कारंजा तालुक्यातील ३४ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. २0१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली होती.
जलयुक्त शिवारच्या या कामांमुळे अनेक प्रकल्प, हातपंप, विहीरी आदि जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईच्या उपाययोजनांवरील तरतूद देखील निम्म्यांपेक्षा कमी झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे.
गतवर्षी ५६१ गावांमध्ये होती पाणीटंचाई!
गतवर्षी जिल्ह्यातील ७९८ गावांपैकी ५६१ गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली होती. त्यानुसार, ५.६८ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. यंदा मात्र २९५ गावांचाच पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात समावेश आहे. यासाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गतवर्षी ५६१ गावांमध्ये ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या. विहिरींमधील गाळ काढून खोलीकरण, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्णत्वास नेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिर खोदकाम, कुपनलिका खोदकाम यासह इतर महत्वाकांक्षी कामे झाली.
- गतवर्षी शासन-प्रशासनाचे प्रयत्न तथा लोकसहभागातून युद्धस्तरावर झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे २५0 पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईच्या संकटातून मुक्ती मिळाली आहे. या सर्वेक्षणातूनच यंदाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत २९५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- शैलेष हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम