कृषी पंपाची थकबाकी २७० कोटींवर!
By admin | Published: June 13, 2017 01:18 AM2017-06-13T01:18:20+5:302017-06-13T01:18:20+5:30
शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन: आर्थिक स्थितीची महावितरणला जाणीव
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून, ती आजमितीस तब्बल २७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे महावितरण हतबल झाले असून, थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान चालू देयक तरी अदा करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ४६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात आली आहे. या विजेच्या आधारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफूल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होत आहे. काही शेतकरी न चुकता विजेचे देयक अदा करतात; मात्र बहुतांश शेतकरी विविध कारणांमुळे नियमित वीज देयक अदा करू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी २७० कोटी रुपयांवर गेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांंपैकी ४० हजार ५०० कृषी पंपधारकांकडे ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे वीज देयक थकीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नसून, शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी पंपांच्या थकबाकीची ही आकडेवारी मोठी वाटत असली तरी, ती एका वर्षातील नाही. त्यातच अनेक शेतकरी नियमित विजबिल भरणा करून वीज वितरणला सहकार्य करीत असल्याने कृषी पंपाच्या जोडणीलाही महावितरणकडून वेग देण्यात येत असल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होते.