२७९ महिला बचत गटांनी धरली व्यवसायाची कास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:40+5:302021-02-07T04:37:40+5:30
कारंजा येथील अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्र हे राज्यातील पहिले लोकसंचालित साधन केंद्र आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ...
कारंजा येथील अल्पसंख्याक लोकसंचालित साधन केंद्र हे राज्यातील पहिले लोकसंचालित साधन केंद्र आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी रुरल मार्टच्या माध्यमातून कारंजा येथे सुरू झालेले विक्री केंद्र सुद्धा राज्यातील पहिलेच विक्री केंद्र ठरले आहे. दरम्यान, कारंजा शहरात २८३ अल्पसंख्याक महिलांचे व शहरी उपजीविका अभियानाचे १५० असे एकूण ४३३ बचत गट कार्यान्वित आहेत. त्यातील ४ हजार ३२६ महिला बचत गटांशी जुळलेल्या आहेत. २७९ अल्पसंख्याक बचत गटांनी गेल्या काही वर्षांत बँकांकडून ७ कोटी ९२ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज उचलून विविध स्वरूपातील उद्योग-व्यवसाय सुरू केलेले आहेत. या माध्यमातून सदर महिला स्वयंनिर्भर होण्यासोबतच कुटुंबालाही हातभार लावत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
...................
बॉक्स :
'समयमती'कडून हातमाग कापडांची निर्मिती
कारंजा येथे बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी समयमती खादी हातमाग कापड निर्मितीचे केंद्र थाटले आहे. त्यात बचत गटातीलच आठ महिला काम करतात. यामधून त्यांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती केंद्र संचालक मनीषा तांगळे यांनी दिली. या केंद्रातून साडी, टॉवेल आणि कापडांची निर्मिती करण्यात येत असून, विक्रीदेखील चांगल्यापैकी होत आहे. खादीच्या कापडामुळे त्वचेचे आजार होत नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असल्याचे तांगळे यांनी सांगितले.