२८ गावे पाणीपुरवठा योजना बंद!
By admin | Published: June 2, 2017 01:24 AM2017-06-02T01:24:07+5:302017-06-02T01:24:07+5:30
नागरिकांचे पाण्यासाठी हाल : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा तालुक्याला वरदान असलेली २८ गावे पाणीपुरवठा योजना ३१ मे रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. १ कोटी २७ लाख रुपये पाणी कर थकीत असल्याने जीवन प्राधिकरणने ही योजना बंद केली. त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी १ जून रोजी केली.
महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण योजनेच्यावतीने २००९ पासून तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने ही योजना चिरकुटा येथील अरुणावती प्रकल्पावरून सुुरू करण्यात आली होती. मे २०१७ पर्यंत या योजनेचे १ कोटी २७ लाख रुपये थकीत आहेत. याबाबत वारंवार संबंधित गावाच्या सरपंच, सचिव तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सूचित केले; मात्र पाणी कर वसूल करून भरण्यात आला नाही. गावकरी जर पाणी कर भरत नसतील, तर त्याचे दायित्व संबंधित ग्रामपंचायतने घेतले पाहिजे; मात्र तसे झाले नाही. तोट्यात असणाऱ्या या योजनेला बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात आले. मानोरा नगरपंचायतने रक्कम भरल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा मात्र सुुरू आहे. थकीत रक्कम भरा, अशा सूचना ंदेऊनही रक्कम भरण्यात आली नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनासुद्धा याबाबत कळविण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, विद्यमान आमदार आदींनी याबाबत लक्ष देऊन काहीतरी तडजोड करून योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने टंचाईग्रस्त गावातील महिलांना दुरून पाणी आणावे लागत आहे. नदी, नाले, हातपंप आटल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. संबंधित गावाच्या सरपंच, सचिवांनी पुढाकार घेऊन पाणी कर वसूल करून पैसे भरावे तसेच नागरिकांनीसुद्धा वसुलीसाठी सहकार्य करावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
योजना तोट्यात; चालविणे अशक्य !
२८ गावे पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. मे २०१७ पर्यंत एकूण १ कोटी २७ लाख रुपये थकीत आहेत. वरिष्ठांच्या आदेशाने ३१ मे रोजी मध्यरात्रीपासून ही योजना बंद केली आहे. योजना पूर्ववत होण्यासाठी नागरिकांनी पाणी कर भरणे गरजेचे आहे किंवा जिल्हा परिषदेने तडजोड करावी, अशी प्रतिक्रिया प्राधिकरणचे शाखा अभियंता गजानन खराटे यांनी दिली.
गव्हा येथे कृत्रिम पाणीटंचाई!
मानोरा : तालुक्यातील गव्हा येथे कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी उपलब्ध असूनही नदीच्या उत्तरेकडील नागरिकांना नियोजनाअभावी पाणी मिळत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे बुधवारी केली. वॉर्ड क्रमांक १ व २ मधील नागरिकांनी निवेदनात नमूद केले, की सार्वजनिक विहिरीवरून अर्ध्या गावाला पाणीपुरवठा केल्या जातो. पाणीटंचाई अंतर्गत विहिरीचे नवीन कामसुद्धा झाले आहे. विहिरीला भरपूर पाणी असूनदेखील ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी नदीच्या उत्तरेकडील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी अनेक वेळा वॉर्ड क्रमांक २ व ३ मधील महिलांनी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत जाऊन पाणी समस्या सोडविण्याकरिता विनंती केली. दलित वस्तीच्या भागात पाणी मिळणे कठीण झाले आहे, तर समर्थक व जवळच्या नागरिकांना भरपूर पाणी सोडले जाते, असा आरोप नागरिकांनी निवेदनातून केला. या प्रकरणाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली. ग्रामपंचायतीने पाणी कर भरावा, अशी मागणी माजी पं.स. सदस्य यशवंतराव इंगळे यांनी केली आहे.