वाशिम जिल्ह्यातील २८८ युवक आत्मनिर्भर; १६.७९ कोटी रुपयांचे कर्जवाटप
By दिनेश पठाडे | Published: March 13, 2023 03:31 PM2023-03-13T15:31:41+5:302023-03-13T15:31:59+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
वाशिम : मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, युवक सक्षम बनावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत विविध व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे कर्जदारांना केवळ मुद्दल भरावी लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, व्यवसायामध्ये उभारी घेता यावी, यासाठी वैयक्तिक कर्ज योजना राबविली जाते. या अंतर्गत युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने युवकांना व्यवसाय उभारता येत आहे. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती.
महामंडळाचे कर्ज घेणाऱ्यांचे वाढते प्रमाण, नियमित कर्जफेड करणाऱ्यास मिळणार प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत केली आहे. या अंतर्गत व्याज परतावा ४ लाख ५० हजार मर्यादेत केला जात आहे. जिल्ह्याला २०२२-२३ या आर्थिक वर्षात किमान ३०० कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २८८ जणांना कर्जवाटप करण्यात आले आहे. महामंडळामार्फत कर्जाचा लाभ घेण्यासाठी ८१७ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी २८८ लाभार्थींना त्या-त्या बँकेकडून कर्ज मिळाले. बँकेत असलेले प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत.
१.६४ कोटींचा व्याज परतावा
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून पंधरा लाख रुपये कर्जापर्यंत व्याज परतावा ४ लाख ५० हजार रुपये मर्यादेपर्यंत केला जातो. आतापर्यंत महामंडळाने व्याज परताव्यापोटी १ कोटी ६४ लाख ५९ हजार ९८२ रुपये बँकांना अदा केले आहेत.