१५ दिवसात २९४ रोहित्रात बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:57+5:302021-06-24T04:27:57+5:30
वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात ...
वाशिम : पावसाळ्यास सुरुवात झाली असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. विविध तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेकदा रात्र अंधारात काढावी लागत आहे. शिवाय इतरही अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे महावितरणकडून रोहित्र तातडीने दुरुस्त करण्याची धडपड दर दिवशी पाहायला मिळत आहे. गत १५ दिवसांत जिल्ह्यात २९४ रोहित्र बिघाडामुळे बंद पडले असून, त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.
वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीजपुरवठा देण्यात कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमी अधिक दाबासह वादळी वारा आणि पावसामुळे रोहित्रात बिघाड होण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रातील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. त्यात सप्टेंबर ते डिसेंबर या प्रकारात लक्षणीय वाढ होते. या काळात महिन्याला ७०० ते ८०० रोहित्र बिघाडाने बंद पडतात. पावसाळ्याच्या दिवसातही असे प्रकार बरेच ठिकाणी घडतात. त्यात गत १५ दिवसातच २९४ रोहित्र नादुरुस्त झाले असून, ग्रामस्थ व व्यावसायिकांची अडचण दूर करण्यासाठी महावितरणने त्यापैकी २७७ रोहित्र दुरुस्त ही केल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.
थकबाकीमुळे १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित
वाशिम जिल्ह्यात महावितरणची ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली असून, जिल्ह्यासाठी ७५.७९ कोटी वसुलीचे उद्दिष्ट या महिन्याच्या सुरुवातीला ठरवून देण्यात आले होते. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे. त्यामुळेच व्यावसायिक आणि वाणिज्य सह कृषी फिडरवरील नादुरुस्त रोहित्र थकबाकी भरल्यानंतरच दुरुस्त करून बसविले जात आहेत. यामुळेच १७ रोहित्रांची दुरुस्ती प्रलंबित आहे.
थकबाकी वसुलीस वेग
ज्या घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, कृषीपंप वीज ग्राहकांचे वीजबिल थकीत आहे. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी मार्चमध्ये काेरोनामुळे लॉकडाऊन झाला. तेव्हापासून ग्राहकांकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता वाशिम जिल्हा अनलॉक झाल्यानंतर थकबाकी वसुलीस महावितरणने वेग दिला आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या तुलनेत पावसाळ्यात रोहित्र बिघाडाचे प्रमाण कमी असते. तथापि, गत १५ दिवसात २९४ रोहित्रात वादळी वारा, पावसामुळे बिघाड झाला. ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची अडचण लक्षात घेता त्यापैकी २७७ दुरुस्त ही करण्यात आले असून, रोहित्र दुरुस्त करून ऑइल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.
-आर. जी. तायडे
कार्यकारी अभियंता,
महावितरण, वाशिम.