३० टक्के बसेस आगारातच; १२ गावांना ‘ऑटोरिक्षा’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:58+5:302021-06-25T04:28:58+5:30
वाशिम: कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे; परंतु अद्यापही ग्रामीण ...
वाशिम: कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याने एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे; परंतु अद्यापही ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने, तसेच बसगाड्यांची संख्या मर्यादित असल्याने ग्रामीण भागांतील बसगाड्या बंदच आहेत. मंगरूळपीर आगारातील ३० टक्के बसेस यामुळेच बंद असून, जवळपास १२ गावांतील प्रवाशांना इतर आगारांच्या बसेस किंवा ऑटोरिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर एसटी प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. त्यात मंगरूळपीर आगाराकडून जवळपास सर्वच मार्गावर एसटी बसेस सुरू करण्यात आल्या; परंतु बसगाड्यांची कमतरता आणि ग्रामीण भागातून मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे या आगारातील ३२ पैकी २५ नियतेच सुरू असून, ७ बंद आहेत. त्यात मानोरा, दारव्हा आणि गोस्ता या बसफेऱ्या पूर्णपणे बंद असून, या मार्गावरील जवळपास १२ गावांतील लोकांना इतर आगारांच्या बसेस किंवा ऑटोरिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.
-------
बॉक्स: या गावांना बस कधी सुरू होणार १) मंगरूळपीर आगारातील बंद बसेस सुरू करण्यासाठी आगार प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. २) कोरोनामुळे प्रवाशांचा प्रतिसाद नसून, हा प्रतिसाद वाढताच बसगाड्या सुरू केल्या जाणार आहेत. ३) काही नादुरुस्त बसेस दुरुस्तीसाठी पाठविल्या असून, त्या दुरुस्त होताच काही गावात एसटीची बस सुरू होईल. ४) शाळा बंद असल्याने मानव मिशनच्या बसेस बंद आहेत. त्या शासन आदेशाने सुरू केल्या जातील.
--------------
बॉक्स: प्रवाशांना खासगी गाड्यांचाच आधार १) कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली तरी ग्रामीण भागात बस पोहोचत नसल्याने ऑटोरिक्षा, काळीपिवळीचा आधार प्रवासी घेत आहेत. २) ग्रामीण भागांतील रस्त्यांची अवस्थाही वाईट असल्याने बसगाड्या बंद असून, अनेक प्रवासी दुचाकी, ऑटोचा आधार घेत आहेत. ३) काही गावात एसटीची बससेवा अनेक वर्षांपासून बंद असल्याने या गावांतील लोकांना काळीपिवळी, ऑटोरिक्षाशिवाय पर्यायच नाही.
---------------------
कोट: मंगरूळपीर आगाराची बोरव्हा बस बंद आहे. ही सकाळची बस आम्हाला सोयीची होती; परंतु आता ऑटोरिक्षाने किंवा इतरांच्या दुचाकीने मंगरूळपीर येथे कामाला जावे लागते.- मारोती देवरे
-----
कोट: मंगरूळपीर आगाराने मानोरा बसफेरी बंद केली आहे. त्यामुळे इतर आगाराच्या बसगाडीची प्रतीक्षा करावी लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.-सतीश चव्हाण,बॉक्स:एकूण बसेस -३२सध्या सुरू बसेस - २५बंद बसेस - ०७
-------------------
बॉक्स: एकूण कर्मचारी एकूण चालक -९५ कामावर चालक -५०एकूण वाहक - ८९ कामावर वाहक -५०
-------