मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी ३० हजारांवर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:50 PM2017-08-05T13:50:54+5:302017-08-05T13:51:11+5:30
वाशिम: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यासाठी ३ आॅगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या ३० हजार ७२७ अर्जांपैकी ११ हजार ३३६ मंजूर करण्यात आले, तर ९५ खारीज करण्यात आले आहेत. याच कार्यक्रमातंर्गत १ जानेवारी २०१७ रोजीच्या अर्हता दिनांकानुसार मतदार यादीत नव्याने नाव दाखल करण्यासाठी प्राप्त ५ हजार ३२७ अर्जांपैकी ३ हजार ८८२ मंजूर करण्यात आले, तर ६९ अर्ज खारीज करण्यात आले.
येत्या काही दिवसांत राज्यभरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसह इतर निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला १ जुलैपासून सुरूवात करण्यात आली. सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली असून, या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ५ हजार ३२७ मतदारांनी नमुना ६ हा फार्म भरून दिला आहे. त्यामधील ३ हजार ८८२ मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ६९ अर्ज खारीज करण्यात आले आणि १ हजार ४२१ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. मयत किंवा स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी आवश्यक असलेल्या नमुना ७ चे ३० हजार ७२७ अर्र्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील ११ हजार ३३६ मतदारांची नावे वगळण्यात आली, तर ९५ अर्ज खारीज करण्यात आले असून, १९ हजार २९६ अर्ज प्रलंबित आहेत. त्याशिवाय मतदापर यादीमधीन मुद्रण दोष दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या नमुना ८ चे ३ हजार ७१ अर्ज निवडणूक कार्यालयाकडे दाखल करण्यात आले. त्यामधील १ हजार ५८८ मतदारांच्या ओळखपत्रात दुरुस्ती करण्यात आली, तर ७ अर्ज खारीज करण्यात आले आहेत आणि १ हजार ४७६ अर्ज प्रलंबित आहेत. त्याशिवाय निवासी पत्त्यामधील बदलासाठी आवश्यक असलेल्या नमुना ८ अ चे ९५ अर्ज जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाले असून, त्यामधील ५७ लोकांच्या निवासी पत्त्यामध्ये बदल करण्यात आला आणि ३८ लोकांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.