‘काठी’ मिरवणुकीची ३०० वर्षांची परंपरा कायम!
By admin | Published: April 10, 2017 01:36 AM2017-04-10T01:36:38+5:302017-04-10T01:36:38+5:30
राजुरा : सुदी येथे पाडव्याच्या मुहूर्तावर उभारलेल्या ‘काठी’ची शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
राजुरा : सुदी येथे पाडव्याच्या मुहूर्तावर उभारलेल्या ‘काठी’ची शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. जवळजवळ ३०० वर्ष जुनी परंपरा आजही गावकऱ्यांनी मनोभावे जपली आहे.
मालेगाव तालुक्यातील सुदी हे गाव जवळपास १५०० लोकवस्तीचे असून, पुुरातन काळापासून भगवान सिद्धेश्वरांना येथील नागरिक कुलदैवत मानतात. गावाच्या मध्यभागी व गाव कुसालगत असे सिद्धेश्वराचे वेगळे दोन मंदिर असून, गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात पंचधातूची पंचभूमी महादेवाची मूर्ती आहे. मंदिरावर गुढीपाडव्याचे दिवशी गत ३०० वर्षांपासून ‘काठी’ उभारली जाते. तिला ‘गुंडा’ असेही संबोधले जाते. पाच दिवस काठीची भक्तीभावे पूजा-अर्चानंतर पंचमीच्या दिवशी काठीची ढोल-ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक काढली जाते. यावेळी अनेकजण हातावर, खांद्यावर व डोक्यावर काठीचा तोल सांभाळत ‘काठी’ला नाचवितात. सुदी येथील काठीची मिरवणूक पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, या मिरवणुकीत आबालवृद्धांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतात. काठी हे माता पार्वतीचे रूप मानल्या जात असल्याचे येथील वयोवृद्ध भाविक सांगतात. यावेळी मंदिरावरसुद्धा भव्य यात्रा महोत्सव व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले अथवा स्थायिक झालेले नागरिकसुद्धा या दिवशी गावात आवर्जुन हजेरी लावतात. शनिवार, ८ एप्रिल रोजी गावातून ‘काठी’ची मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी सिद्धेश्वर मंदिरावर काठीचे विधिवत पूजन केले.