वाशिम जिल्ह्यात १२७ प्रजातींच्या ३ हजार पक्ष्यांची नोंद
By admin | Published: March 3, 2017 01:06 AM2017-03-03T01:06:07+5:302017-03-03T01:06:07+5:30
‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’: पक्षी अभ्यासकांना विद्यार्थ्याचे मौलिक सहकार्य
वाशिम, दि.२ : ग्रेट बँकयार्ड बर्ड काऊंटिंग कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात पक्षी अभ्यासक आणि विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मिळून केलेल्या पक्षी निरक्षणात वाशिम जिल्ह्यात १२७ प्रजातींचे ३ हजार १६३ पक्षी आढळून आले. ही माहिती वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर यांनी बुधवारी ही माहिती दिली.
वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर, अकोला येथील पक्षी अभ्यासक रवि धोंगळे, सतिश धोंगळे, वाशिम येथील निलेश सरनाईक, प्रा. हेमंत कुमार वंजारी, निखिल गोरे, अक्षय खंडारे यांच्यासह बाकलीवाल विद्यालयातील अस्मिता संगवार, ऐश्वर्या पाचपिल्ले, सारिका मोरे, विवेक गोरे, जयेश गड्डम, जय मोटे, कार्तिक रंगभाळ, प्रतिक्षा सुरूशे, वर्षाली देशकर, वैष्णवी वानखडे, श्वेता अंभोरे, अंकिता इंगळे यांनी, तर शिवाजी विद्यालयातील वैष्णवी बोरकर आणि राधादेवी बाकलीवाल विद्यालयातील जान्हवी पवार, सारिका डिंकुटवार, रुपाली इंगोले, या १७ विद्यार्थ्यांनी वाशिम जिल्ह्यातील एकबूर्जी तलाव, संतोषी माता नगर वाशिम-शेलुबाजार मार्ग, इरिगेशन कॉलनी कारंजा, काजळेश्वर कारंजा लाडसह इतर काही जलाशये आणि मोकळ्या जागेवर फिरून पक्ष्यांचे निरीक्षण केले. या ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट कार्यक्रमांतर्गत त्यांनी ३ हजार १६३ पक्षांच्या नोंदी केल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी बर्ड कॉउंट पक्षी नोंदीचे महत्व व प्रत्यक्ष पक्षी नोंदणी कशी करावी हे जाणून घेतले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत.
सजीवसृष्टीत पक्ष्यांचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ग्रेट बँकयार्ड बर्ड काऊंट हा कार्यक्रम राबविण्यात येतो. यंदा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला. पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद असला तरी, त्याला शास्त्रीय ज्ञानाची दुसरी बाजू आहे. त्यामुळेच पक्ष्यांचे निरीक्षण करताना गोळा होणारी माहिती पक्ष्यांबद्दलच्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उकल करते.
एकबुर्जी प्रकल्प परिसरात ११२ प्रजाती
पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात केवळ वाशिम तालुक्यातील एकबूर्र्जी प्रकल्पावर तब्बल ११२ प्रजातींचे २ हजार ७२० पक्षी आढळून आले. यामध्ये रेडी शेल डक , बार हेडेड गूज, नादरन शोवेलर, कॉमन पोचार्ड डक, यलो वॅगटेल, लेसर व्हिसलिंग डक, स्राईप आदि स्थलांतर करणाऱ्या विदेशी पक्ष्यांसह विदर्भात प्रामुख्याने मोठ्या संख्येत असलेला फ्लेमिंगोसह रिव्हर टर्न या पक्षाचा समावेश आहे. वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनात विद्यार्थी व पक्षी अभ्यासकांनी जवळपास १२ तास एकबूर्जी प्रकल्पावर घालवत या पक्षांंच्या नोंदी घेतल्या.