वाशिम जिल्ह्यात ३ हजार शेतकरी मदतीपासून वंचितच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 11:28 AM2021-01-06T11:28:44+5:302021-01-06T11:32:49+5:30
Agriculture Sector News अतिवृष्टीसह विविध आपत्तीने एकूण ६ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीसह विविध आपत्तीने एकूण ६ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ५१ लाखांच्या निधीचा प्रस्ताव विभागीयस्तरावर सादर केला. तथापि, केवळ २ हजार शेतकऱ्यांना आजवर शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकली असून, अद्यापही ३ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायमच आहे.
गतवर्षीच्या अर्थात २०२० च्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांचा पिच्छा पुरविला. त्यात मूग, उडिद, कपाशीसह सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, शासनाने राज्यभरातच झालेल्या पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यात महसूल आणि कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त पाहणीत जिल्ह्यातील ९५५२ शेतकऱ्यांच्या ६ हजार ३५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले, तसेच ४९ हेक्टर क्षेत्रातील जमिनींचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी केली होती.
गत खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीने मूग, उडिद पीक हातून गेले, तर परतीच्या पावसाने सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले. प्रशासनाने या नुकसानाची पाहणी करून अहवालही सादर केला, परंतू दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी, आम्हाला अद्याप शासनाकडून मदत मिळाली नाही.
- नितिन उपाध्ये,
शेतकरी, काजळेश्वर
जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान विविध नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ४.५२ कोटीच्या निधीचा प्रस्ताव विभागीय स्तरावर पाठविण्यात आला होता. त्यापैकी निम्मा निधी मिळाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात आली आहे.
- शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम