जिल्ह्यात ३० हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:13+5:302021-03-24T04:39:13+5:30
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. यात सर्व प्रथम कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका वठविणारे ...
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. यात सर्व प्रथम कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका वठविणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू झाले. त्यासाठी २२ हजार डोस प्राप्त झाले होते. या मोहिमेत ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले असतानाच शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी सुरुवातीला ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत व्यवस्था करण्यात आली, पुढे ही संख्या वाढवून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू झाले, तर वाशिम शहरात सात खासगी रुग्णालयांत अडीचशे रुपयांत लसीकरण सुरू करण्यात आले. या सर्व ठिकाणी मिळून २९ हजार ४०६ व्यक्तींना लस देण्यात आली.
-----------------
लसीकरणाचे प्रमाण
अधिकारी कर्मचारी - ९७ टक्के
ज्येष्ठ नागरिक - १२ टक्के
दुर्धर आजारग्रस्त - ३७ टक्के
-------------------------
बाह्य रुग्ण कक्ष पडले ओस
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिसू लागताच जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्ष विभाग ओस पडला. दर दिवशी येथे होणाऱ्या तपासण्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवर आले.
----------------------
गंभीर रुग्णांची संख्या घटली
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागताच आरोग्य यंत्रणा या विषाणूचा संसर्ग रोखण्यात गुंतली, तर नागरिकांना शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यात धास्ती वाटू लागली. त्यामुळे गंभीर आजारग्रस्त ही खासगी रुग्णालयांकडे वळले.
---------------------
कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीची विभागणी
आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने जिल्हा रुग्णालयातील नियमित उपचार पद्धती आणि कोरोना उपचार करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीची विभागणी करण्यात आली.
-------------------
जिल्हा रुग्णालयास काेविड केअर सेंटरचे
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हास्तरावर कोरोना चाचणी आणि उपचारासाठी स्वतंत्र सुविधांचा अभाव होता. त्यामुळे बाधितांच्या संपर्कातील रुग्णांचे थ्रोट स्वॅब घेण्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले जाऊ लागले. उपचाराची व्यवस्थाही सुरुवातीला नव्हती. पुढे स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांसह इतर ठिकाणी शासकीय आणि खासगी कोविड केअर सेंटर सुरू केल्याने हे चित्र बदलले.