राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये उभारले जाणार धान्य चाळणी यंत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:56 PM2018-09-05T14:56:30+5:302018-09-05T14:59:39+5:30
राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ४ सप्टेंबरला घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकºयांच्या शेतमालाला योग्य व वाजवी दर मिळण्यासाठी शेतमालाची प्रतवारी निश्चित होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ४ सप्टेंबरला घेतला आहे.
संबंधित ३१ बाजार समित्यांमध्ये आवक होणाºया धान्यवर्गीय शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारी करण्यासाठी प्रत्येकी १ यानुसार ३१ धान्य चाळणी यंत्र उभारण्याची बाब प्रस्तावित होती. त्यासाठी २०.२१ कोटींचा खर्च येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेकडून २५ टक्के अनुदान अर्थात ५ कोटी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. उर्वरित ७५ टक्के निधी हा संबंधित बाजार समित्यांनी त्यांच्या स्वनिधीतून उभा करावयाचा आहे. सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासननिर्णयात नमूद केले आहे.
प्रतवारीच्या नावाखाली शेतकºयांची पिळवणूक!
सद्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतमालाची विक्री करणाºया शेतकºयांची प्रतवारीच्या नावाखाली पिळवणूक केली जात आहे. काही व्यापाºयांकडून मनमानी पद्धतीने प्रतवारी निश्चित करून तशापद्धतीने शेतमालाचा दर ठरविला जातो. ही गंभीर बाब लक्षात घेवून बाजार समित्यांमध्येच धान्य चाळणी यंत्र आस्थापित करून शेतमालाची प्रतवारी निश्चित करण्यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचा सूर शेतकºयांमधून उमटत आहे.
सुरूवातीच्या टप्प्यात धान्याची अधिक आवक होणाºया राज्यातील ३१ बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर तुलनेने छोट्या बाजार समित्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध होईल. मात्र, तुर्तास तरी वाशिम जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत असा कुठलाही प्रकल्प उभा होणार नाही.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम