वाशिम जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या आवारात ३२८ वाहने बेवारस पडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:21 PM2019-06-09T12:21:26+5:302019-06-09T12:21:33+5:30
विविध प्रकारच्या ३२८ वाहनांची विल्हेवाट लावली जाणार असून ही वाहने ज्यांच्या मालकीची आहेत, त्यांनी पुराव्यांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेट देवून बेवारस पडून असलेल्या वाहनांचा आढावा घेतला. दरम्यान, विविध प्रकारच्या ३२८ वाहनांची विल्हेवाट लावली जाणार असून ही वाहने ज्यांच्या मालकीची आहेत, त्यांनी पुराव्यांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये १०५ वाहने, मालेगावात ४२, पोस्टे रिसोडमध्ये ८६, शिरपूर येथे १६, कारंजा शहर येथे ६५, कारंजा ग्रामिण येथे ४, जऊळका येथे १७, आसेगाव येथे २ आणि अनसिंग पोलिस स्टेशन येथे १ अशी ३२८ वाहने बेवारस स्थितीत आहेत. संबंधितांनी पुरावे सादर करून वाहनांची मालकी सिद्ध करावी, असे आवाहन करण्यात आले.
...अन्यथा वाहनांचा लिलाव!
पोलिस ठाण्यांच्या आवारात बेवारस पडून असलेल्या वाहनांच्या मालकांनी वाहन मालकी हक्काचे कागदपत्र घेवून हजर व्हावे; अन्यथा महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ८५ व ८७ नुसार सदर वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल, असे कळविण्यात आले.