रिसोड येथे स्वस्त धान्य गोदामासाठी ३.३९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:44 PM2019-02-23T13:44:05+5:302019-02-23T13:45:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी यासाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार शासनाच्या सार्वजनिके बांधकाम विभागाने ३ कोटी ३९ लाख ४६ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकास गुरुवार २१ फेब्रुवारीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा विभागाला अन्नधान्य साठवणूक करण्यासाठी पुरेशा क्षमतेची गोदामे नसल्याने अडचणी येत आहेत. रिसोड येथे ही समस्या जाणवत असल्याने आणि पर्यायी व्यवस्था करण्यात अडथळे उद्भवत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन साठवण क्षमतेचे गोदाम उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर रिसोड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांनी तयार केलेल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच रिसोड तहसीलदारांनी साक्षांकन केलेल्या गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली. या अंदाजपत्रकानुसार नियोजित जागा उपभोक्ता विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र मिळवून सदर गोदाम बांधकामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या नवीन गोदाम बांधकामासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर शासकीय गोदामाचे काम तातडीने सुरू करून विहित मुदतीत पूर्ण केले जाणार आहे. सदर गोदामाचे बांधकाम प्रगतीपथावर असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधीक्षक अभियंत्यांना किमान तीन वेळा भेट देऊन कामाची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याची खात्री करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करावा लागणार आहे.