एस. टी.च्या ३४० बसेसनी अर्ध्या रस्त्यातच सोडली साथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:21 PM2021-02-10T12:21:42+5:302021-02-10T12:22:20+5:30

State Transport News दोन वर्षांत एस. टी. महामंडळाच्या ३४० बसेस रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

340 buses left half way in Washim district | एस. टी.च्या ३४० बसेसनी अर्ध्या रस्त्यातच सोडली साथ!

एस. टी.च्या ३४० बसेसनी अर्ध्या रस्त्यातच सोडली साथ!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : तांत्रिक बिघाड, पंक्चर होणे यासह अन्य कारणांमुळे गत दोन वर्षांत एस. टी. महामंडळाच्या ३४० बसेस रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्ह्यात वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व रिसोड असे चार आगार आहेत. वाशिम आगारामध्ये मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. चार आगार मिळून १८९ बसेस असून, १० वर्षांवरील जवळपास ३२ बसेस आहेत. सुरक्षित प्रवासासाठी अजूनही अनेकजण महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देतात. एस. टी. महामंडळाची खासगी प्रवासी वाहनाशी स्पर्धा असून, प्रवाशांची पळवापळवी होऊ नये म्हणून आगार परिसरातील २०० मीटरमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी करण्यास मनाई आहे. आगार परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये खासगी प्रवासी वाहने उभी करणाऱ्याविरूद्ध योग्य ती कारवाई करावी, यासंदर्भात पोलीस व वाहतूक शाखेकडे आगार प्रमुखांतर्फे पत्रव्यवहारही करण्यात येतो. खासगी प्रवासी वाहनांशी स्पर्धा करताना एस. टी. महामंडळाला काही प्रमाणात नादुरूस्त व जुनाट बसेसमुळे गैरसोयीला सामोरे जावे लागते. तांत्रिक बिघाड उद्भवणे, पंक्चर होणे, स्टेअरिंग जाम होणे आदी कारणांमुळे गत दोन वर्षांत चार आगार मिळून जवळपास ३४० बसेस रस्त्यातच बंद पडल्या. 
काही बसेस ‘दे धक्का’ या प्रकारातील असल्याने वाहकासोबतच प्रवाशांनादेखील संबंधित बसला धक्का देण्याची वेळ येते. शहरांसह ग्रामीण भागातही महामंडळाच्या बसेसमुळे दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. खासगी प्रवासी वाहनाच्या तुलनेत सुरक्षित प्रवास असल्यामुळे महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्याला अनेक प्रवासी पसंती देतात. 
दुसरीकडे तांत्रिक बिघाड व अन्य कारणांमुळे रस्त्यातच बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतो. 

रस्त्यातच एस. टी. बंद पडण्याची कारणे
अनेक बसेसची आयुर्मयादा संपत आल्याने तांत्रिक बिघाडामुळे अधूनमधून प्रवासादरम्यानच त्या बंद पडतात. तांत्रिक बिघाड निर्माण होणे, पंक्चर होणे, स्टिअरिंग जाम होणे, वायरिंगमध्ये दोष निर्माण होणे आदी कारणांमुळे रस्त्यातच काही बसेस बंद पडतात. या बसेस बंद पडल्यानंतर महामंडळाच्या दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसवून दिले जाते.


१० वर्षांवरील ३० बसेस
वाशिम, रिसोड, कारंजा व मंगरूळपीर असे चार आगार मिळून जिल्ह्यात १८९ बसेस आहेत. यापैकी जवळपास ३० बसेस या १० वर्षांपूर्वी आगारात दाखल झालेल्या आहेत. जास्तीत जास्त १२ वर्षांपर्यंत बसचा वापर करता येतो. रिसोड आगारात आठ बसेस १० वर्षांपूर्वी दाखल झाल्या. 

वर्षाला आठ लाख रुपये एस. टी. मेन्टेनन्सला
महामंडळाच्या बसेसची नियमित देखभाल, दुरूस्ती करण्यात येते. यासाठी एका वर्षाला साधारणत: सात ते आठ लाख रुपये मेन्टेनन्सला खर्च येतो. चारही आगारात बसेसची दुरूस्ती करण्यात येते. दरम्यान, बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च अकोला येथील मुख्य कार्यालयातून होत असल्याने या संदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले. साधारणत: साठ ते आठ लाख रुपये खर्च येतो. 

रिसाेड आगारांतर्गत २०१८ मध्ये १२२ तर २०१९ मध्ये ११७ बसेस मार्गातच बिघाडामुळे बंद झाल्या होत्या. आगारात १० वर्षांवरील जवळपास आठ बसेस आहेत. बसेसची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यात येते.
-श्रीकांत जगताप, आगारप्रमुख, रिसोड

आगारनिहाय संख्या
वाशिम    ५३
कारंजा    ४५
रिसोड     ४५
मं.पीर     ४६

Web Title: 340 buses left half way in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.