महाबीजच्या बियाण्यात आढळली ३५ टक्के भेसळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:13 AM2020-09-26T11:13:05+5:302020-09-26T11:13:36+5:30
पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: येथील गोपाल आरेकर या शेतकऱ्याने यंदा महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर त्यात दोन प्रकारची झाडे उगवली होती. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी ‘सोयाबीन बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने दखल घेत १५ सप्टेंबर रोजी या पिकाची पाहणी केली. या संदर्भातील अहवाल तयार झाला असून, पथकाने केलेल्या निरीक्षणात शेतकºयानी पेरलेल्या बियाण्यात ३५ टक्के भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंझोरी येथील शेतकरी गोपाल आरेकर यांनी कारंजा येथील एका कृषीसेवा केंद्रातून महाबीजच्या एका सोयाबीन वाणाचे ७ बॅग बियाणे खरेदी केले. त्यापैकी ३ बॅग बियाणे त्यांनी स्वत:च्या मालकीच्या १.२१ हेक्टर क्षेत्रात, तर उर्वरित ४ बॅग बियाणे त्यांचे वडिल हरीदास आरेकर यांच्या १.६२ हेक्टर क्षेत्रात पेरले होते. हे बियाणे चांगल्या प्रकारे उगवले; परंतु पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या झाडांना दोन प्रकारच्या शेंगा लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे बियाण्यांत भेसळ असल्याचे आणि उत्पादनात घट येणार असल्याचे त्यांना दिसले.
त्यांनी याबाबत पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे तक्रार केली. लोकमतने या संदर्भात ८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले.
त्याची दखल घेत मानोरा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी डिगांबर मकासरे, कृषी शास्त्रज्ञ राजेश डवरे, मानोरा तालुका कृषी अधिकारी व्ही. के. घोडेकर, महाबिजचे प्रतिनिधी एम. एस. धांडे, मंडळ कृषी अधिकारी जी. व्ही. जयताळे, कृषी पर्यवेक्षक एम. एन. मनवर, कृषी सहायक मनोज जयस्वाल आदिंनी पाहणी केली. त्यावेळी बियाण्यांत ३५ टक्के भेसळ असल्याचे आढळून आले. या संदर्भातील अहवाल संबंधित शेतकºयाला त्यांनी दिला आहे.