राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले! मनोज जरांगे यांचा दावा
By संतोष वानखडे | Published: December 5, 2023 08:45 PM2023-12-05T20:45:39+5:302023-12-05T20:46:11+5:30
"आतापर्यंत राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. कोणी कितीही विरोध केला तरी राज्यातील मराठ्यांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणारच, याचा पुनरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला."
वाशिम : मराठा-कुणबी नोंदी आढळल्याने आतापर्यंत राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले असून, २४ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्वच मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल, असे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. ते आज काटा (ता.जि. वाशिम) येथे आयोजित सभेत बोलत होते.
मनोज जरांगे-पाटील यांची विदर्भातील चवथी मराठा आरक्षण मार्गदर्शन सभा सकल मराठा समाजाच्यावतीने काटा येथे ५ डिसेंबर रोजी आयोजित केली होती. सायंकाळी ४:३० वाजता सुरू झालेल्या या सभेला हजारोंच्या उपस्थितीत सकल मराठा समाजबांधवांची उपस्थिती होती. कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा नोंदी सापडत असून, आतापर्यंत राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. कोणी कितीही विरोध केला तरी राज्यातील मराठ्यांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणारच, याचा पुनरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला.
शांततेच्या आंदोलनात मोठी ताकद आहे, शांततेच्या आंदोलनाने मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणले आहे. त्यामुळे यापुढेही आणखी एकजूट दाखवा, शांत राहा, कुठेही उद्रेक किंवा जाळपोळ करू नका, कोणी कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला तरी मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा, असा सल्लाही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. संचालन प्रा. गजानन वाघ, प्रास्ताविक किशोर देशमुख तर आभार विरेंद्र देशमुख यांनी मानले. राष्ट्रगिताने सभेची सांगता झाली.