‘मदतनीस’साठी ३५ हजार घेतले; एसीबीने रंगेहात पकडले, लाचप्रकरणी दोघे ताब्यात
By संतोष वानखडे | Published: October 4, 2023 05:42 PM2023-10-04T17:42:30+5:302023-10-04T17:42:41+5:30
२६ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्यासाठी कनिष्ठ सहायक मनोज जगन्नाथ भोजापुरे याने ५० हजार रुपयाची लाच मागितली.
वाशिम: तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या मानोरा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या कनिष्ठ सहाय्यकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ४ ऑक्टोबर रोजी मानोरा पंचायत समिती कार्यालय परिसरातून ताब्यात घेतले. मनोज जगन्नाथ भोजापूरे (५५) व संतोष आत्माराम वानखेडे (३७) रा. रा. गिराट (ता. मानोरा) अशी आरोपींची नावे आहेत.
२६ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस या पदावर निवड करून देण्यासाठी कनिष्ठ सहायक मनोज जगन्नाथ भोजापुरे याने ५० हजार रुपयाची लाच मागितली. यामध्ये एका खासगी इसमालादेखील सहभागी करून घेण्यात आले. मात्र, तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने ३ ऑक्टोबर रोजी पडताळणी कार्यवाही केली असता, तडजोडी अंती ३५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी आरोपींनी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. यावरून ४ ऑक्टोबर रोजी मानोरा पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपींनी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयाची लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या चमूने आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मनोज भोजापूरे व संतोष वानखेडे यांच्याविरूद्ध मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड व चमूने पार पाडली.