‘जलसंपदा’त कर्मचाऱ्यांची ३५० पदे रिक्त!
By admin | Published: April 7, 2017 01:36 AM2017-04-07T01:36:04+5:302017-04-07T01:36:04+5:30
सिंचन व्यवस्थापनावर विपरीत परिणाम
वाशिम : शासनाने १ एप्रिल २०१६ पासून जिल्ह्यात नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविले नाही. परिणामी, तब्बल ३५० पदे रिक्त असल्याने सिंचन व्यवस्थापनाच्या कामावर विपरीत परिणाम जाणवत असल्याची माहिती सूत्रांनी गुरुवार, ६ एप्रिल रोजी दिली.
वाशिमच्या जलसंपदा विभागाला सिंचन व्यवस्थापन कामांची जबाबदारी सांभाळण्याकरिता ४३४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, नव्याने १० सिंचन शाखा निर्माण झाल्यानंतरही त्यापैकी केवळ १३४ पदेच भरलेली असून, उर्वरित ३५० पदे रिक्त आहेत. परिणामी, सिंचन व्यवस्थापनाची कामे पाहताना जलसंपदा विभागाची अक्षरश: दाणादाण उडत आहे.
सिंचन व्यवस्थापनांतर्गत वर्ग १ मध्ये उपकार्यकारी अभियंत्याची तीन पदे रिक्त आहेत. वर्ग २ मध्ये कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, शाखा अभियंतांची नऊ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मध्ये विभागीय लेखापाल, वरिष्ठ लिपिक दोन, कनिष्ठ लिपिक दोन, टंकलेखक दोन, लघूलेखक एक, संगणक एक, वाहनचालक चार, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १२, दप्तर कारकून १२, कालवा निरीक्षक ३९, मोजणीदार १८, वर्ग ४ ची कालवा टपाली सहा, संदेशक सहा, नाईक एक आदी पदे रिक्त आहेत.