कोरोनामुळे ३६ वर्षांच्या वारीत खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:28 AM2021-07-20T04:28:16+5:302021-07-20T04:28:16+5:30
मी ३५ वर्षे पंढरीची वारी केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांचा मोठा सोहळा होत असतो. पांडुरंगाचे लाखो भाविक या ...
मी ३५ वर्षे पंढरीची वारी केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांचा मोठा सोहळा होत असतो. पांडुरंगाचे लाखो भाविक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यासोबतच राज्यातील लहान मोठ्या पालख्या या पंढरपूर येथे दरवर्षी जात असतात. मात्र, गेल्या एक वर्षांहून कोरोनाचे संकट टळताना दिसत नाही. त्यामुळे ३५ वर्षांच्या वारीत खंड पडला आहे. वारी बंद पडल्याने विठूरायाचे नामस्मरण घरी बसूनच करत आहे
-पुंडलिक गरबडे
वारकरी, इंझोरी
-------
वारीतील खंडामुळे विठ्ठलभक्त निराश
सलग २५ वर्षे मी पंढरीची वारी केली. कोरोनामुळे पंढरपूर वारीला खंड पडला. गतवर्षी शासनाकडून वारीवर मोठे निर्बंध लावण्यात आले होेते. यंदाही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने वारी होणार नसल्याचे दिसत आहे. पंढरीच्या वारीत सहभागी होऊन पांडुरंगाचे नामस्मरण करण्याचा आनंदच काही वेगळा असतो. यंदा तो आनंद घेता येणार नाही. परिसरातील शेकडो विठ्ठल भक्त त्यामुळे निराश झाले आहेत. आम्हाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.
-यमुनाबाई गरबडे,
वारकरी, इंझोरी
---------------
कोरोनामुळे आता वारीत खंड पडत आहे.
सलग १६ वर्षे आम्ही पंढरीची वारी केली. कोरोनामुळे आता वारीत खंड पडत आहे. यंदा मठामधील संत माहात्म्यांनाच पंढरीत प्रवेश नाही, मग आम्हा साध्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांचे काय. कोरोनामुळे वारीवर मर्यांदा येणार असल्या तरी विठ्ठलाच्या भक्तीत मात्र खंड पडणार नाही. पंढरीच्या वारीचा नेत्र दिपविणारा सोहळा अनुभवता येणार नसला तरी, अंतरात्म्यात वसलेल्या पांडुरंगाला कोण दूर करणार, वारीला न जाण्याचे दु:ख आहेच, परंतु हे संकट पांडुरंग दूर करेल, काही काळाने पुन्हा पंढरीच्या वाऱ्या सुरू होतील.
-गजानन डाके
वारकरी, इंझोरी