मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट
By संतोष वानखडे | Updated: March 17, 2025 06:45 IST2025-03-17T06:45:16+5:302025-03-17T06:45:54+5:30
येथे दिवाळी व उन्हाळी सुटीतही पाचवीचा वर्ग सुरू ठेवून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली जाते.

मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट
वाशिम : बहुतांश शिक्षकांना दिवाळी व उन्हाळी सुटीचे वेध लागतात. मात्र, वाशिम तालुक्यातील साखरा व उकळीपेन येथील जिल्हा परिषदेच्या शाळा याला अपवाद ठरत आहेत. येथे दिवाळी व उन्हाळी सुटीतही पाचवीचा वर्ग सुरू ठेवून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली जाते.
साखरा आणि उकळीपेन जिल्हा परिषद शाळा सुटीच्या काळातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील आहेत. साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नियमित वर्गांसोबतच सुटीत शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची विशेष तयारी केली जाते. गतवर्षी येथे १८ विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले. उकळीपेन जिल्हा परिषद शाळादेखील सुटीच्या कालावधीत पाचवीचा वर्ग सुरू ठेवते आणि नवोदय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करते. गतवर्षी या शाळेचे ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
हजारावर विद्यार्थी
साखरा जिल्हा परिषद शाळा : पहिली ते नववी - ९२९ विद्यार्थी
उकळीपेन जिल्हा परिषद शाळा : पहिली ते सातवी - २६९ विद्यार्थी
वाशिम तालुक्यातील साखरा आणि उकळीपेन शाळांमध्ये पाचवीचा वर्ग वर्षभर सुरू असतो. त्यामुळेच नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेश परीक्षेत या शाळांचे निकाल उत्तम लागतात.
गजानन बाजड, गटशिक्षणाधिकारी, वाशिम