‘पशूसंवर्धन’च्या औषधीचे ३७ लाख परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 03:08 PM2019-03-16T15:08:55+5:302019-03-16T15:09:06+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २०१८-१९ या वर्षात औषध खरेदीसाठी आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २०१८-१९ या वर्षात औषध खरेदीसाठी आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. ३१ मार्च संपायला केवळ १५ दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने आणि या १५ दिवसात सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाल्याने, ३७.५० लाखांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यात श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ असे एकूण ५८ पशूवैद्यकीय दवाखाने व पशू उपचार केंद्र आहेत. जिल्हयात आठ लाखांच्या आसपास पशूधन आहे. या पशुंच्या उपचारासाठी दरवर्षी विविध प्रकारची औषधी पुरविली जाते. सन २०१८-१९ या वर्षात औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३७.५० लाखांचा निधी मिळालेला आहे. या निधीतून आवश्यक ती औषध खरेदी करता यावी यासाठी जिल्हा परिषद स्तरावर जून, जुलै महिन्यातच आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यानंतर औषध खरेदीचा प्रस्ताव मंजूरीसाठी पशुसंवर्ध़न विभागाच्या पुणे येथील आयुक्तांकडे पाठविण्यात आला. अद्याप या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नाही. फेब्रुवारी महिन्यात सुधारीत दर सुचीनुसार व औषधीनिहाय पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला मिळाल्या. त्यानुसार जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सुधारीत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मंजूरी मिळेल, या अपेक्षेत असलेल्या पशुसंवर्धन विभागाला १५ मार्चपर्यंतही वरिष्ठांकडून मंजूरीसंदर्भात कोणताही संदेश मिळाला नाही. त्यामुळे आहे त्या औषधी साठ्यातूनच जनावरांवर उपचार करण्याची कसरत पशुसंवर्धन विभागाला करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता असल्याने औषध खरेदीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळेल की नाही, अशी शक्यताही वर्तविली जात होती. परंतू, औषध खरेदी ही बाब अत्यावश्यक म्हणून गणली जात असल्याने ३१ मार्चपूर्वी केव्हाही औषध खरेदीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळू शकते, असा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.
(प्रतिनिधी)