वाशिम येथे नाट्यगृहासाठी ३८ लाखांचा निधी
By Admin | Published: June 29, 2017 07:40 PM2017-06-29T19:40:55+5:302017-06-29T19:40:55+5:30
वाशिम: जिल्हा मुख्यालयी नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास २८ जून रोजी मान्यता देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हा मुख्यालयी नाट्यगृह उभारण्यासाठी अंतिम टप्प्याचे अर्थसहाय्य म्हणून राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास २८ जून रोजी मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३१ डिसेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाद्वारे वाशिम येथे नाट्यगृह उभारण्यासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील ३८ लाख रुपयांचा निधी यापूर्वी वितरित करण्यात आला होता; परंतु सदर निधी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला नसल्याने तो निधी आहरीत करता आला नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन कक्षाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला पाठविण्यात आले होते. त्या पत्रानुसार ३१ डिसेंबर २०१६ चा निर्णय रर्दद करून वर्ष २०१७-१८ मध्ये सदर नाट्यगृहास तिसऱ्या व अंमि टप्प्यातील हप्त्यापोटी ३८ लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. या निधीच्या वापरासाठी शासनाच्या ७ नोव्हेंबर २०१२ च्या निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करणे वाशिम नगर परिषद आणि वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, नाट्यगृहाच्या बांधकामासंदर्भात वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही १५ मे २०१७ रोजी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आता या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निधी वितरित करण्यात आल्याने नाट्यगृहाच्या कामाला वेग मिळणार आहे.