नाट्यगृहासाठी ३८ लाखांचा निधी
By admin | Published: June 30, 2017 01:21 AM2017-06-30T01:21:08+5:302017-06-30T01:21:08+5:30
अधिकाऱ्यांची माहिती : वाशिम येथील इमारतीच्या कामाला येणार वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा मुख्यालयी नाट्यगृह उभारण्यासाठी अंतिम टप्प्याचे अर्थसहाय्य म्हणून राज्य शासनाकडून ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात नाट्यगृहाच्या भव्य इमारतीचे बांधकाम या निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे. सदर माहिती वाशिम नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडून गुरुवारी प्राप्त झाली.
वाशिम हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी कलारसिक आणि नाट्यप्रेमींसह कलावंतांच्या सोयीसाठी नाट्यगृह उभारण्याची मागणी होती. स्थानिक नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्यावतीने शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात आल्यानंतर या ठिकाणी नाट्यगृह उभारणीस मंजूरी देण्यात आली. एकूण ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेले हे नाट्यगृह नगर परिषदेने स्वत: काही रक्कम गुंतविण्यासह शासनाच्या निधीने उभारण्याचे निश्चित झाले. यासाठी शासनाकडून नगर परिषदेला चार कोटी रुपये निधी मंजूरही करण्यात आला. त्यानंतर शहरातील अकोला नाका परिसरात नाट्यगृहाच्या भव्य इमारतीचे बांधकाम मागील वर्षांपासूनच सुरू झाले. यात शासनाकडून मंजूर निधीतील तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा निधी म्हणून ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणे बाकी होते. त्यासाठी शासनाकडे नगर परिषदेच्यावतीने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३१ डिसेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाद्वारे वाशिम येथे नाट्यगृह उभारण्यासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. या निधीच्या खर्चाबद्दल शासनाकडून अहवाल आणि माहितीही मागविण्यात आली; परंतु सदर निधी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयास तोपर्यंत प्राप्त झाला नसल्याने सदर निधी आहरीत करता आला नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन कक्षाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला पाठविण्यात आले. त्या पत्रानुसार ३१ डिसेंबर २०१६ चा निर्णय रद्द करून वर्ष २०१७-१८ मध्ये सदर नाट्यगृहास तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील हप्त्यापोटी २८ जूनच्या सुधारित निर्णयाद्वारे ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. या निधीच्या वापरासाठी शासनाच्या ७ नोव्हेंबर २०१२ च्या निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करणे वाशिम नगर परिषद आणि वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, नाट्यगृहाच्या बांधकामासंदर्भात वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही १५ मे २०१७ रोजी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आता या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निधी वितरित करण्यास मान्यता मिळाल्याने नाट्यगृह इमारतीच्या कामाला वेग मिळणार आहे.
वाशिम शहरात नाट्यगृह उभारणीसाठी विविध संघटना, कलावंत, नाट्यप्रेमींनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. याला प्रशासनाचे योग्य सहकार्य मिळाल्याने नाट्यगृहाचा प्रश्न निकाली निघाला होता. नाट्यगृहासाठी भरीव निधी प्राप्त झाल्यानंतर आता अंतिम टप्प्याचे अर्थसहाय्य म्हणून राज्य शासनाने ३८ लाखांचा निधी मंजूर केला.