भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान
By नंदकिशोर नारे | Published: February 28, 2023 04:03 PM2023-02-28T16:03:57+5:302023-02-28T18:46:46+5:30
सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले.
वाशिम - मालेगाव तालुक्यातील करंजी येथे २८ फेब्रुवारी राेजी पहाटे चार वाजताच्या सुमारास दलित वस्तीत लागलेल्या आगीत सुधाकर किसन कांबळे यांच्या ३९ बकऱ्या जळून खाक झाल्या.
सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले. कांबळे यांच्या बकऱ्यांसाेबतच शेजारी असणारे दत्ता वानखेडे यांच्या सुद्धा म्हशीच्या गाेठ्याला आग लागून त्यांचे लाखाच्यावर नुकसान झाले. आगीमध्ये बाळू खंदारे यांच्या घरातील अन्नधान्याची नासाडी, शेषराव सिताराम खिल्लारी यांचे गुरांच्या गाेठयातील तीन स्पिंकलर संच, अंदाजे ९० पाईप, व शेतीचे संपूर्ण भांडवल जळून खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु, आग आटोक्यात आली नाही. शिरपूर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले, अग्निशामन दलाने आग विझवून पुढील अनर्थ टळला. घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी, मालेगावचे तहसीलदार, रवी काळे ,तलाठी गणेश बेदरकर, ग्रामसेवक विलास नवघरे, डॉक्टर साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य पती सुनील लहाने, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ खिल्लारे, सरपंच अयोध्या दिगंबर खाडे, उपसरपंच गीता खाडे, माजी सरपंच गोपाल लहाने, माजी सरपंच सुरेश लहाने, गणेश पाटील लहाने व राजू लहाने यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून १० लाख ५१ हजार ८०० रुपये एवढे नुकसान झाल्याचा अंदाज तलाठी गणेश बेदरकर यांनी पंचनामा नाेंदविला.