शासकीय रुग्णालयात बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांसाठी ४० खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:55 AM2021-02-27T04:55:45+5:302021-02-27T04:55:45+5:30
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल होणाऱ्या महिलांकरिता ४० खाटा असून, त्यातील १० खाटा या सिझर होणाऱ्या महिलांकरिता; ...
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल होणाऱ्या महिलांकरिता ४० खाटा असून, त्यातील १० खाटा या सिझर होणाऱ्या महिलांकरिता; तर ३० खाटांवर नॉर्मल प्रसूती झालेल्या महिलांना ठेवले जाते. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही. प्रसूतीकरिता दाखल होणाऱ्या महिलेसोबत येणाऱ्या नातेवाईकांचीही कुठलीच सोय नसते. तीन स्त्री रोगतज्ज्ञ कार्यरत असून, ते नियमित राऊंडवर येत असल्याचे दिसून आले. याशिवाय बेड, गादी, बेडशीटची चांगली सुविधा उपलब्ध असून, प्रसूतीकरिता दाखल झालेल्या काही महिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी समाधान व्यक्त केले.
...................
पिण्याचे पाणी, स्वच्छतेचा बोजवारा
वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे प्रसूती व बाळंतपणाकरिता दाखल होणाऱ्या महिलांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. यासह पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने एकतर घरून किंवा बॉटलचे विकत आणलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते. या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
.................
काळजी घेण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ कार्यरत
१) जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती व बाळंतपणासाठी दाखल होणाऱ्या महिलांची काळजी घेण्यासाठी तीन स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
२) या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ठरवून दिलेल्या वेळा पाळल्या जात असल्याचे पाहावयास मिळाले.
३) डॉक्टरांचा राऊंड वेळेवर होतो किंवा नाही, याकडे जिल्हा शल्यचिकित्सकही विशेष लक्ष पुरवित असल्याचे दिसून आले.
..................
कोट :
प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर परिचारिकांनी विशेष काळजी घेतली. प्रसूती झाल्यानंतर ज्या कक्षात ठेवण्यात आले, त्याठिकाणी गादी, बेडशिट स्वच्छ होती; मात्र स्वच्छतागृहांमध्ये घाण पसरलेली असल्याने काहीअंशी गैरसोय झाली.
- सुमेरा खान
........................
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. डॉक्टरांकडूनही विशेष काळजी घेतली जाते; मात्र केवळ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असून, याकडे रुग्णालयाने लक्ष देणे आवश्यक आहे.
- झाकीर खान
......................
उपलब्ध खाटा
बाळंतपणासाठी महिला आल्यानंतर - ४०
बाळंतपणानंतर सिझरसाठी खाटा - १०
बाळंतपणानंतर नॉर्मलच्या खाटा - ३०