दुष्काळातही ४0 लाखांचा धुव्वा!
By admin | Published: November 14, 2015 02:15 AM2015-11-14T02:15:16+5:302015-11-14T02:15:16+5:30
वाशिम जिल्ह्यात फटाक्यांची विक्री झाली जोमात ; ४0 लाखांची उलाढाल
वाशिम : जिल्ह्यात गत तीन वर्षांंपासून दुष्काळ असून, कृषिव्यवसायाची दैनावस्था झाली आहे; मात्र दिवाळीनिमित्त जिल्ह्यात ४0 लाख रुपयांचे फटाके फोडण्यात आले. दिवाळीनिमित्त मोठय़ा प्रमाणात फटाके फोडले जातात. यावर्षी विविध संघटनांच्यावतीने पर्यावरणपूर्वक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला बगल देत ४0 लाखांवर किमतीच्या फटाक्यांची विक्री करण्यात आली. जिल्हाधिकार्यांनी चिनी फटाक्यांची विक्री न करण्याचे आवाहन करून, फटाक्यांची विक्री करणार्या व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश दिले होते. हा आदेश झुगारून अनेक व्यावसायिकांनी बंदीतही चिनी फटाक्यांची विक्री केली; मात्र त्यानंतरही एकाही विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली नाही. दिवाळी उत्सवात फटाके फोडल्याने दुष्परिणामच होत असल्याने अनेक संघटनांच्यावतीने फटाके न फोडता सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या सर्व आवाहनांना झुगारत नागरिकांनी लाखो रुपयांचे फटाके फोडून दिवाळी साजरी केली. दिवाळीमध्ये गतवर्षी २३ लाख रुपयांपर्यत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये जवळपास दुप्पट वाढ होऊन ४0 लाख रुपयांचे फटाके फोडण्यात आल्याचे व्यावसायिकांच्या व्यवसायावरून दिसून येते. यावर्षी नागरिकांनी सर्वाधिक चिनी फटाक्यांना मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. फटाक्यांचे भाव गत दोन वर्षांंपेक्षा जास्त दिसून आल्याने दरवर्षी हजारो रुपयांचे फटाके नेणार्या ग्राहकांनी काही प्रमाणात कमी फटाके नेल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.