४० हजारांवर रुग्णांची तपासणी; ९ जण आढळले कर्करोगग्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 03:50 PM2020-02-04T15:50:27+5:302020-02-04T15:50:34+5:30
एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४० हजार ५२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४० हजार ५२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ९ जणांना विविध स्वरूपातील कर्करोग जडल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झाली. मंगळवार, ४ फेब्रूवारीला असलेल्या जागतिक कर्करोग दिनापासून जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहभर जिल्ह्यात कर्करोग तपासणी शिबीर राबवून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये गावपातळीपर्यंत पोहचून ३० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींची ‘आशा’मार्फत प्राथमिक तपासणी करून संशयित रुग्णांना आरोग्य उपकेंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाईल. गर्भाशय, मुख कर्करोगाकरिता आरोग्य संस्थेमध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ असेटिक अॅसिड (व्ही.आय.ए.) ची प्राथमिक तपासणी केली जाते. व्ही.आय.ए.ची तपासणी पॉझिटिव्ह असलेल्या तसेच स्तन व मुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येते. तसेच संशयित रुग्णांच्या गाठीच्या मासाचा तुकडा तपासणीसाठी पाठविला जातो.
एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान जिल्ह्यात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी ३ हजार ५६१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८६ संशयित रुग्ण आढळले. तपासणीअंती २ रुग्ण कर्करोगग्रस्त आढळले. स्तनाच्या कर्करोगासाठी १० हजार ५०८ महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ संशयित रुग्ण आढळले व ५ रुग्ण कर्करोगग्रस्त आढळले. तोंडाच्या कर्करोगासाठी २६ हजार ४५९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ संशयित रुग्णांच्या संशयित गाठीच्या तुकड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २ रुग्णांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले असून कर्करोगग्रस्त सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित शासकीय व निमशासकीय कर्करोग रुग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झाली.
स्तनाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे
स्तनात किंवा काखेत गाठी, स्तनात सूज येणे किंवा स्तन जाड होणे, स्तनाच्या त्वचेवर सूज किंवा सुरकुत्या पडणे किंवा खळी पडणे, स्तनाग्र व स्तनावर त्वचा लालसर असणे किंवा खपली पडणे, स्तनाग्र आतमध्ये जाने किंवा आकारात बदल होणे किंवा दुखणे, स्तनाग्रातून दुधाव्यतिरिक्त स्त्राव किंवा रक्तयुक्त स्त्राव निघणे, स्तनाच्या भागात किंवा काखेत सतत दुखणे ही स्तनाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत.
तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे
तीन आठवड्यांपेक्षा अधिक तोंडात सतत जखमा असणे, तोंडात सतत वेदना होणे, हिरड्या, जीभ आणि घशात पांढरे आणि लाल चट्टे होणे, गळ्यात व्रण येणे किंवा आवाज घोगरा होणे, चावण्यास आणि गिळण्यास त्रास होणे, जीभ आणि जबड्याच्या हालचाली करताना त्रास होणे, मसाल्याचे पदार्थ खाताना त्रास होणे, जिभेला किंवा तोंडातील भागात रक्तस्त्राव किंवा बधिरता येणे, दातांना सैलपणा येणे किंवा जबडे आणि दात दुखणे, आवाजात बदल होणे किंवा बोलताना त्रास होणे, वजन कमी होणे, सतत अयोग्य श्वासोच्छवास, टोकदार दातांमुळे गालांना वारंवार चावल्यासारखे वाटणे ही तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत.
गर्भाशयाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे
दोन मासिक पाळीदरम्यान योनीतून रक्तस्त्राव होणे, मासिक पाळी अधिक काळ असणे किंवा नियमितपेक्षा जास्त जाणे, मासिक पाळी बंद झाल्यानंतर रक्तस्त्राव होणे, दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव निघणे, असामान्य रक्तयुक्त योनी स्त्राव, कंबर दुखणे, थकवा येणे किंवा अत्यंत थकणे, कारण नसताना वजनात घट होणे, पायात दुखणे, लघवी करताना दुखणे हे कर्करोगाची लक्षणे असून ती आढळल्यास शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.