वाशिम जिल्ह्यात ११ दिवसात वाढले ४०४ कोरोना रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 01:00 PM2020-08-12T13:00:37+5:302020-08-12T13:01:02+5:30
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या ११ दिवसात तब्बल ४०४ रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली. एकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे बाजारपेठेत नागरिकांची गर्दीही कायम असल्याचे दिसून येते. नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच तेजीत असून, आॅगस्ट महिन्यात सुरूवातीच्या ११ दिवसात तब्बल ४०४ रुग्ण आढळून आले. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९९८ वर पोहोचली असून यापैकी ३५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. बाहेरगावावरून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी मेडशी येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून, जुलै महिन्यात रुग्णसंख्या वाढली असून, आॅगस्ट महिन्यात यामध्ये अधिक झपाट्याने वाढ झाली. १ ते ११ आॅगस्ट या ११ दिवसात तब्बल ४०४ रुग्ण वाढले आहेत. तालुकास्तरावर संदिग्ध रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जात आहेत. सध्या १३० संदीग्ध रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. ९९८ पैकी ३५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. १८ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ६२८ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक दक्ष राहावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला.
असे वाढले रुग्ण
आॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. १ आॅगस्ट रोजी २६, २ आॅगस्ट रोजी ४१, ३ आॅगस्ट रोजी ९२, ४ आॅगस्ट रोजी ३२, ५ आॅगस्ट रोजी पाच, ६ आॅगस्ट रोजी २३, ७ आॅगस्ट रोजी ५७, ८ आॅगस्ट रोजी ३४, ९ आॅगस्ट ३१, १० आॅगस्ट रोजी २१ आणि ११ आॅगस्ट रोजी ४२ असे ११ दिवसात ४०४ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ५ आॅगस्टचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व दिवशी दोन आकड्यात रुग्णसंख्या वाढली. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी सुरू आहे.