व्यावसायिक प्रतिनिधीसाठी ४१९ दुकानदार इच्छुक!

By admin | Published: April 8, 2017 01:54 AM2017-04-08T01:54:58+5:302017-04-08T01:54:58+5:30

पुरवठा विभागाने बँकांकडे सादर केला रेशन दुकानदारांचा प्रस्ताव : बँकांच्या प्रादेशिक कार्यालयांकडून मिळणार प्रस्तावांना मान्यता

419 shopkeepers interested in business representative! | व्यावसायिक प्रतिनिधीसाठी ४१९ दुकानदार इच्छुक!

व्यावसायिक प्रतिनिधीसाठी ४१९ दुकानदार इच्छुक!

Next

वाशिम : जिल्ह्यातील ८५० पैकी ४१९ रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेते हे बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुक असून, तसे संमतीपत्र पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी पुरवठा विभागाने सदरचा प्रस्ताव संबंधित बँकांकडे पाठविला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात रास्त भाव व केरोसीन दुकानाचे जाळे विणण्यात आले आहे. रास्त भाव व किरकोळ केरोसीन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी डिसेंबर २०१६ मध्ये शासनाने कार्यपद्धती निश्चित केली. या कार्यपद्धतीनुसार रास्त भाव दुकानदारांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. जिल्ह्यात बँकेच्या विविध १२ प्रकारच्या सेवा रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन दुकानदारांमार्फत पुरविल्या जाणार आहेत. जिल्ह्यात एकूण स्वस्त धान्य दुकानदार ७७४, तर किरकोळ केरोसीन विक्रेत्यांची संख्या ८५४ अशी आहे. या दुकानदारांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून सेवा देण्याकरिता संमतीपत्र मागविण्यात आले. ३६५ रास्त भाव दुकानदार आणि ४४ किरकोळ केरोसीन दुकानदार, असे एकूण ४१९ जणांनी पुरवठा विभागाकडे संमतीपत्र जमा केले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा विभागाने या प्रस्तावांची छाननी करून संबंधित बँकांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सुपूर्द केले. संबंधित बँकांनी पुढील मंजुरीसाठी सदर प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयांकडे पाठविले असून, अंतिम मंजुरीनंतर ४१९ दुकानदारांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळणार आहे.

बँक व्यावसायिक प्रतिनिधींची अशी राहील सेवा
व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना रास्त भाव दुकानदारांनी बचतीबाबत जनजागृती करणे, छोट्या ठेवी जमा करणे, कमी रकमेचे कर्ज वाटप करणे, कर्ज मागणीच्या अर्जातील मूळ माहितीची व आकडेवारीची पडताळणी करणे, तसेच कर्ज मागणी अर्ज जमा करणे, कमी रकमेच्या कर्जाची वसुली करणे, स्वयं सहाय्यता बचत गट इत्यादींना चालना देणे आदी १२ प्रकारच्या बँक सेवा पुरवायच्या आहेत. बँकेच्या विविध सेवा स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून गावपातळीवर उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्या दृष्टिकोनातून दुकानदारांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी बनविण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली.

बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुक असणाऱ्या रास्त व किरकोळ केरोसीन दुकानदारांकडून संमतीपत्र भरून घेण्यात आली. एकूण ४१९ जणांचे संमतीपत्र प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचे प्रस्ताव संबंधित बँकांकडे पुढील कार्यवाहीसाठी दिले आहेत. संबंधित बँकांच्या वरिष्ठांकडून या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेत्यांना सेवा देत येणार आहे.
- अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम.

 

Web Title: 419 shopkeepers interested in business representative!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.