क्षयरोगाचे ४४८ तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 11:06 AM2021-07-26T11:06:19+5:302021-07-26T11:06:39+5:30
448 suspected TB patients and 783 suspected leprosy patients found: ३१ ऑक्टोबरपर्यंत १०.६२ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २.६९ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी क्षयरोगाचे ४४८, तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले असून, २७ क्षयरुग्ण, तर ११ कुष्ठरुग्ण असल्याचे निदान झाले. ३१ ऑक्टोबरपर्यंत १०.६२ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधून व संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करून रोगाचे निदान व औषधोपचार केला जाणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विनाविकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत औषधोपचार देणे तसेच विकृती प्रतिबंध करणे आणि समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाच्या संसर्गाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत १० लाख ६२ हजार ८७१ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये शहरी भागातील ७३०१७ तर ग्रामीण भागातील ९८९८५४ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक अशा एकूण १०३९ जणांची नियुक्ती केली आहे.
आतापर्यंत २.६९ लाख नागरिकांची तपासणी झाली आहे. यापैकी क्षयरोगाचे ४४८, तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले. यापैकी २७ जणांना क्षयरोग तर ११ जणांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले. या सर्व रुग्णांना उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान गृहभेटीकरिता येणा-या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही. देशपांडे यांनी केले.
संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत जिल्ह्यात १० लाख ६२ हजार ८७१ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीतून क्षयरोगाचे ४४८ तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले. यापैकी २७ जणांना क्षयरोग तर ११ जणांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले असून या सर्व रुग्णांना उपचाराखाली ठेवण्यात आले आहे.
- डॉ. एस.व्ही देशपांडे
जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम