गव्हाला ४५ हजार, हरभऱ्याला ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार; रब्बी हंगामातील पीककर्ज वाटप झाले सुरू
By दिनेश पठाडे | Published: October 11, 2023 04:29 PM2023-10-11T16:29:56+5:302023-10-11T16:30:07+5:30
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीककर्ज वाटप केले जाते.
वाशिम : जिल्हा मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षात पीककर्ज वाटपाचे दर यापूर्वीच निश्चित केले आहेत. त्यानुसार रब्बी हंगामातील पिकांसाठी ठरवून दिलेल्या दरानुसार पीककर्ज वाटप केले जाणार आहे. बागायती गव्हाला हेक्टरी ४५ हजार तर बागायती हरभरा पिकासाठी हेक्टरी ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार आहे.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीककर्ज वाटप केले जाते. वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्याला २०२३-२४ मध्ये १५५ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्या-त्या बँकेला लक्ष्यांक ठरवून देण्यात आला आहे. १ ऑक्टोबरपासून रबी पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली असून ३१ डिसेंबरपर्यंत कर्ज वाटप करता येणार आहे. दरवर्षी खरीप हंगामातील पीककर्ज वाटपास सुरुवात होण्यापूर्वी पीकनिहाय कर्ज वाटपाचे दर मार्चमध्ये निश्चित केले जातात.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जात आहे, तसेच सार्वजनिक बँकांनी हेक्टरी आणि एकरी पीकनिहाय दरनिश्चित केले आहेत. बागायती आणि फळ पिकांसाठी सर्वाधिक दर आहे. कोरडवाहू पिकांना कमी पीककर्ज दर आहे. दरम्यान, पीककर्ज वाटप करण्यात बँकांनी विलंब न करता कर्ज मागणी प्रस्ताव दाखल करताच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा खरीप हंगामात विक्रमी कर्जवाटप झाले आहे. त्यानुसार रबी हंगामातही उद्दिष्टानुसार पीककर्ज वाटप करून शंभर टक्के कर्ज वाटप करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना दिल्या आहेत.
कोणत्या पिकाला किती कर्ज (हेक्टरी)-
हरभरा कोरडवाहू : ३१०००
हरभरा बागायती : ३६,०००
गहू बागायती : ४५,०००
करडी : ३२,४००
सूर्यफूल : २७,७२०
जवस कोरडवाहू -२५२००
भुईमूग- ४५६००
कांदा- ८७,६००
बटाटा- ८७,६००