४५० विहिरींची कामे रखडली
By Admin | Published: April 9, 2017 04:39 PM2017-04-09T16:39:49+5:302017-04-09T16:39:49+5:30
मंगरुळपीर तालुुक्यात तब्बल ४५० शेतकºयांना देयके मिळाली नसल्याने ते या योजनेपोटी कर्जबाजारी झाल्याचे दिसत आहे.
मंगरुळपीरमधील वास्तव: देयके मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
मंगरुळपीर: महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरींची कामे देयकाअभावी रखडली आहेत. मंगरुळपीर तालुुक्यात तब्बल ४५० शेतकऱ्यांना देयके मिळाली नसल्याने ते या योजनेपोटी कर्जबाजारी झाल्याचे दिसत आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्याला विहिर मंजूर झाल्यानंतर विविध टप्प्यातील मुल्यांकनानुसार तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि त्यातील शेकडो शेतकऱ्यांना विहिरी मंजूरही झाल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांनी शेतीमाल विकून, सोने तारण ठेवून, कर्ज काढून विहिरींची कामे सुरू केली. शासनाच्या मंजूर अनुदानात विहिरीचे काम होत नसतानाही त्यांनी पदरचा शिल्लक पैसा लावण्याच्या तयारीवर विहिरीचे काम सुरू केले. आज ना उद्या पैसा मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. विहिरींचे पहिल्या टप्प्यातील काम केल्यानंतर मुल्यांकनानुसार शेतकऱ्यांना नहिल्या टप्प्याचे अनुदान आणि दुसऱ्या टप्प्यातील काम केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान शेतकऱ्याला मिळायला हवे; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील तब्बल ४५० विहिरींची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे होऊनही देयके मिळत नसल्याने या विहीरींची कामे रखडली आहेत.