२५ टक्क्यातून ४५२ विद्यार्थ्यांचा प्रवेश
By admin | Published: April 27, 2017 12:26 AM2017-04-27T00:26:18+5:302017-04-27T00:26:18+5:30
खासगी शाळेतील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : अजूनही जागा रिक्त
वाशिम: दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळण्यासाठी शिक्षण विभागाने आॅनलाईन प्रक्रिया राबविली. आॅनलाईन अर्ज सादर केलेल्या ४५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत जिल्ह्यात जवळपास ८२ नामांकित खासगी शाळा येतात. मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित शाळांना आॅनलाईन नोंदणी करून इत्यंभूत माहिती सादर करणे बंधनकारक आहे. मार्च महिन्यात मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. तत्पूर्वी खासगी शाळांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. पात्र शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. एकूण ९०८ जागांसाठी ७५१ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांची छानणी केल्यानंतर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. एकूण ४५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. आॅनलाईन अर्ज सादर करण्यास पालकांची उदासिनता, ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अनुत्सूकता, त्रूटींचे अर्ज आदी कारणांमुळे मोफत प्रवेश कोट्यातील जागा रिक्त राहिल्या आहेत.
दरम्यान, विविध फेरीत या जागा भरल्या जाणार आहेत. आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना योग्य ते प्रशासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर आवश्यक त्या फेरीतून प्रवेश मिळतील. मात्र, त्यासाठी आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे बंधनकारक होते.