४६३२ परीक्षार्थी देणार महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:13 PM2019-03-22T13:13:25+5:302019-03-22T13:13:29+5:30
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी जिल्ह्यातील १४ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून, ४६३२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी जिल्ह्यातील १४ परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून, ४६३२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. शहरातील सर्व १४ परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र परीक्षार्थींना स्वत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबतच स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचा) यापैकी कोणतेही दोन मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी लागणार आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत.
उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहणार आहे.आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत साधन, साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागणार आहे.