वाशिम जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:38 PM2018-08-27T12:38:41+5:302018-08-27T12:40:29+5:30
यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनानुसार १०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाºया उच्च प्राथमिक (इयत्ता ६ ते ८) शाळांमध्ये मानधन तत्वावर अतिथी निदेशकांची नेमणूक केली जाते. त्यानुसार, यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली.
शासनाकडून दरवर्षी ‘यू-डाईस’ची माहिती प्रमाणित केली जाते. त्याआधारे सर्वशिक्षा अभियानाची वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास मंजूरी मिळते. प्रमाणित केलेल्या माहितीनुसार पात्र शाळा आणि त्याकरिता आवश्यक ठरणाºया अतिथी निदेशकांची नेमणूक केली जाते. दरम्यान, ‘यू-डाईस’मधील उपलब्ध माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात सद्या १०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाºया १६ उच्च प्राथमिक शाळा आहेत. त्यावर प्रत्येक शाळेत तीन याप्रमाणे ४८ निदेशकांच्या नेमणूकीचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने शालेय शिक्षण विभागाकडे सादर केला होता. त्यास मंजूरी मिळाल्यानंतर सदर शाळांवर ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आली. ही नियुक्ती एप्रिल २०१९ पर्यंत असणार आहे. यामुळे इयत्तानिहाय व विषयनिहाय उपलब्ध तासिकांवर अतिथी निदेशकांच्या रुपाने शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.