परराज्यातील ४,८०९ कामगार अडकले वाशिम जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:00 AM2020-04-15T11:00:00+5:302020-04-15T11:00:08+5:30
४ हजार ८०९ कामगारांसह महाराष्ट्रातील ३६८ नागरिकांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले. हे कामगार अद्यापही जिल्ह्यातच असून, प्रशासनाने त्यांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवले आहे. या सर्व कामगारांची सकाळ, सायंकाळी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून, कोणातही कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असल्याने केंद्र आणि राज्य शासनानेही यावर नियंत्रणासाठी कठोर पावले ऊचलली आहेत. त्यात १५ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’सह सर्व दळणवळण सेवा (जिवनावश्यक सेवा वगळता) कोणत्याही जिल्ह्यांतून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजीच लॉकडाऊन ३ मे पर्यंत राहिल, असे घोषित केले. ऊदरभरणासाठी राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह विविध कामांसाठी परराज्यातून वाशिम जिल्ह्यात आलेले कामगार अडकून पडले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अडकून पडलेल्या अशा कामगारांची माहिती प्रशासनाने संकलित केली. त्यानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यात मिळून २० राज्यातील ४८०९ कामगार अडकलेअसल्याचे स्पष्ट झाले. या सर्व कामगारांसाठी स्थानिक प्रशासनाने रिलिफ कॅम्प स्थापन करून त्यांच्या भोजनासह निवाºयाची व्यवस्था केली. दरम्यान, रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेल्या परराज्यातील या कामगारांना ९ दिवस पूर्ण झाले असून, या कामगारांची सकाळ, सायंकाळ, अशी दोन वेळा तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्यात कोणाही कामगाराला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळून आली नाहीत.
लॉकडाऊन संपेपर्यंत कॅम्पमध्येच ठेवणार
कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यासह देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच सर्व जिल्ह्यांच्या सीमाबंद करण्यात आल्या आहेत. अशात वाशिम जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात किंवा गावी पाठविणे अयोग्य ठरणार असून, कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लागू केलेले लॉकडाऊन संपेपर्यत या कामगारांना रिलिफ कॅम्पमध्येच ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
वाशिम जिल्ह्यात अडकून पडलेल्या २० राज्यातील ४ हजार ८०९ कामगारांसह महाराष्ट्रातील ३६८ नागरिकांना रिलिफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांची दिवसातून दोन वेळा तपासणी होत असून, अद्याप कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग वा इतर आजार झाल्याची लक्षणे दिसून आली नाहीत.
-डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम