४९१ ग्रा.पं.चे ‘रेकॉर्ड’ जि.प.च्या रडारवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:01 AM2017-07-18T01:01:44+5:302017-07-18T01:01:44+5:30
चार दिवस चालणार तपासणी : जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर सहा पथकांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ (अभिलेख) अद्ययावत राहत नसल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील एकूण ४९१ ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ जुलैपासून सुरू होणारी तपासणीची ही मोहीम २१ जुलैदरम्यान चार दिवस चालणार आहे.
वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, विविध वित्त आयोगांतर्गत तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासनातर्फे लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना पुरविला जातो. याशिवाय स्थानिक पातळीवरील विविध करांचा पैसादेखील विकास कामांसाठी उपयोगी पडतो. या सर्व निधींचा लेखाजोखा ग्रामपंचायतींनी अद्ययावत ठेवणे अपेक्षित आहे. लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड (अभिलेखे) उपलब्ध असणेही आवश्यक असते. तथापि, काही ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत राहत नाही तर काही ग्रामपंचायती रेकॉर्ड सादरच करीत नसल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनात आली आहे. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड अद्ययावत राहत नसल्याने लेखा परीक्षणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आक्षेप घेण्यात येतात तसेच काही ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड तपासणीस वेळेवर उपलब्ध होत नाही.
पर्यायाने ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होतात. यावर तोडगा म्हणून तसेच ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनाने १८ जुलैपासून रेकॉर्ड तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सहाही पंचायत समिती स्तरावर विशेष पथकांचे गठण केले आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, मिनी बीडीओ, विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पंचायत समितीचे पथक हे दुसऱ्या पंचायत समितींतर्गतच्या ग्राम पंचायतींच्या रेकॉर्डची पाहणी व तपासणी करणार आहे. पंचायत समिती स्तरावरील सभागृहात संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे १८ ते २१ जुलै दरम्यान ग्रामपंचायतच्या रेकॉर्डसह उपस्थित राहणार आहेत.
अशी राहील ग्रामपंचायतींवरील कार्यवाहीची दिशा!
रेकॉर्ड तपासणीला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड ३० जूनपर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या होत्या. सदर रेकॉर्ड उपलब्ध करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविली होती. आता सदर रेकॉर्ड उपलब्ध झाल्याचे गृहित धरून पंचायत समिती स्तरावर येऊन विशेष पथकातर्फे चार दिवस तपासणी केली जाणार आहे. पंचायत समितीच्या सभागृहात सर्व ग्राम पंचायतीचे रेकॉर्ड, दप्तर घेऊन संंबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व मिनी गटविकास अधिकारी यांची सभा घेतली जाणार आहे. यावेळी रेकॉर्ड तपासणी केली जाणार आहे. रेकॉर्ड सादर न करणाऱ्यांवर कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.
ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ (अभिलेख) अद्ययावत असणे गरजेचे आहे. काही ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत राहत नसल्याचे रेकॉर्ड अद्ययावत कसे ठेवावे, यासह इतर महत्त्वाची माहिती देण्यासाठी १८ जुलै ते २१ जुलै दरम्यान पंचायत समिती स्तरावर मोहीम राबविली जाणार आहे.
- प्रमोद कापडे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, वाशिम.