हरवलेले अन् गहाळ झालेले ५० मोबाईल मूळ मालकांना परत
By संतोष वानखडे | Published: February 7, 2024 06:49 PM2024-02-07T18:49:16+5:302024-02-07T18:49:26+5:30
मागील वर्षी एकूण हरविलेले/गहाळ झालेले एकूण ३५८ मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना परत केले होते.
वाशिम : हरविलेले, गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात वाशिम पोलिसांना यश आले असून, ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात ५० मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
केंद्र शासनाच्या ‘सीईआयआर’ या वेबपोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोयीचे झाले असून नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी झाल्यास तत्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदविली तसेच सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर पुढील तपासाला गती मिळते. जिल्ह्यातील हरविलेले/गहाळ झालेले एकूण ५० मोबाईल ‘सीईआयआर’ पोर्टलद्वारे शोधण्यात आले. वाशिम घटकातील हरविलेले/गहाळ झालेले एकूण ५० मोबाईल संच (अंदाजे किंमत ३.५५ लाख) ७ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचेहस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
मागील वर्षी एकूण हरविलेले/गहाळ झालेले एकूण ३५८ मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना परत केले होते. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम सुनीलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर नीलिमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद इंगळे व त्यांच्या चमूने पार पाडली.