५० टक्के ईटीएम भंगार; लालपरीत पुन्हा खटखट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:43+5:302021-07-27T04:42:43+5:30
एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ईटीएम आता कालबाह्य झाल्या आहेत. असे असतानाही त्या वापरण्याची सक्ती वाहकांना करण्यात ...
एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ईटीएम आता कालबाह्य झाल्या आहेत. असे असतानाही त्या वापरण्याची सक्ती वाहकांना करण्यात येत आहे. एसटी महामंडळाला तब्बल १९ हजार बसच्या माध्यमातून महिन्याकाठी कोट्यवधींचा महसूल मिळत होता. हा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाने आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून ४५ हजार मशीन्स खरेदी केल्या आहेत. संबंधित कंपनीच्या सूचनेनुसार या मशीन्सची वयोमर्यादा पाच वर्षे आहे. मात्र, या मशीन्सची खरेदी करून आठ वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. या मशीन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकीट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहक त्रस्तही झाले असून, अनेक वाहकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील चार आगारात मिळून ३९८ पैकी १९९ म्हणजेच ५० ईटीएम नादुरुस्त आहेत.
-----------------------
दुष्काळात तेरावा महिना
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निर्बंधांमुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. रातराणी बसफेऱ्या बंद असून, ग्रामीण भागांतील फेऱ्यांची संख्याही घटली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात ३० टक्के घट आली आहे. अशात मालवाहतुकीचा एसटी महामंडळाला मोठा आधार होत असल्याचे दिसते.
-----------------------
वाहकांकडून आकड्यांची जुळवाजुळव
जुन्या मशीनचे प्रशिक्षण साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी देण्यात आलेले आहे. तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले. परंतु, इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे जुन्या ट्रे वापराचा विसर पडला आहे. प्रशिक्षण नसल्याने चुकीचे तिकीट जाण्यासह कारवाईही अंगलट येण्याची भीती व्यक्त होत असून, वाहकांना आता किती तिकिटे गेली, त्याचे पैसे किती याचा हिशेब करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
-----------------------
पगार मिळतोय हेच नशीब
गत दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे अधून-मधून एसटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवली जात असून, ही वाहतूक सुरू असतानाही प्रवाशांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत असताना कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पुरेशा निधी मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पगार मिळतो, हेच नशीब असल्याचे मत कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
-----------------------
कोट: आगारात उपलब्ध ९८ ईटीएमपैकी केवळ ३० ईटीएमच सुस्थितीत आहेत. उर्वरित मशीन नादुरुस्त असल्याने आता पारंपरिक ट्रेचा वापर करावा लागत आहे. काही मशीन दुरुस्त करण्याच्याही स्थितीत राहिल्या नाहीत.
-मुकुंद न्हावकर, आगार प्रमुख
कारंजा
-----------------------
१)- एकूण ईटीएम - ३९८
२)- नादुरुस्त ईटीएम - १९९
-----------------------
जिल्ह्यातील तिकीट मशीनची स्थिती
आगार - ईटीएम मशीन - बिघाडा - ट्रेचा वापर
वाशिम - ११९ - ६९ - ०८
कारंजा - ९७ - ६७ - १५
मं.पीर - ९८ - ५० - ०७
रिेसोड - ७४ - १३ - १०
--------------------
---------