वाशिम जिल्ह्यात अल्पशा पावसावर आटोपल्या ५० टक्के पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 03:04 PM2019-07-01T15:04:15+5:302019-07-01T15:04:44+5:30
अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दरवर्षीच्या पावसाळ्यात १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सरासरी १५८.५२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र तुलनेने उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे हे प्रमाण केवळ ९१.३६ मिलीमिटर असून लघू आणि मध्यम अशा १३४ पैकी शंभरावर सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. दुसरीकडे अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ ते २९ जून या कालावधीत ही सरासरी १५८.५२ मिलीमिटर असते. यंदा मात्र चालू महिन्यात वाशिम तालुक्यात १००.७६, मालेगाव ९३.५६, रिसोड ८८.३, मंगरूळपीर ९१.८५, मानोरा ६९.७० आणि कारंजा तालुक्यात १०४.२३ असा सरासरी ९१.३६ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे. त्याची टक्केवारी ११.४४ असून पावसाच्या पहिल्याच महिन्यात पर्जन्यमान ६७ मिलीमिटरने घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नदी-नाले, विहिरी, कुपनलिका, हातपंपांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत वाढ झाली नसून ३ मध्यम व १३१ लघू अशा एकंदरित १३४ सिंचन प्रकल्पांपैकी शंभरावर प्रकल्प आजही कोरडेच आहेत.
दरम्यान, जमिनीत किमान ९ ते १० इंचाची ओल आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांच्या पेरणीची घाई करू नये; अन्यथा पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीची शक्यता उद्भवू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला होता; मात्र पावसाळ्यास आधीच उशिर झाल्याने आणि पावसाचा जोर वाढल्यास पेरणीची कामे शक्य होणार नसल्याने पहिल्या एक-दोन पावसातच सुमारे ५० टक्के शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. त्यास कृषी विभागाकडूनही दुजोरा मिळाला. दरम्यान, हा निर्णय बहुतांशी गावांमध्ये सद्यातरी योग्य ठरल्याचे दिसून येत आहे.