गृह विलगीकरणात ५०० रुग्ण; घरावर ‘पॉझिटिव्ह’चा बोर्ड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:56 AM2021-02-25T04:56:19+5:302021-02-25T04:56:19+5:30
अलीकडच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांवर ...
अलीकडच्या काळात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांवर आरोग्य विभागाने १४ दिवस वॉच ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह; परंतु सौम्य लक्षणे असलेल्या, फारसा त्रास न जाणवणाऱ्या तसेच घरातच स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची व्यवस्था असलेल्या आणि स्वत:साठी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करणाऱ्या रुग्णांना ‘गृह विलगीकरणा’चा पर्याय जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. सध्या ५०० रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या घरावर लहान आकारातील ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह’ असा फलक (बोर्ड) लावण्यात येत आहे.
..........
बॉक्स
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आढावा
गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या तब्येतीचा आणि एकंदरित स्थितीचा आढावा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नियमित घेण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, ग्रामीण व शहरी भागात गृह विलगीकरणात असलेले काही रुग्ण घराबाहेर पडत असल्याची चर्चा आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर १४ दिवस वॉच ठेवण्याचा सूचना दिलेल्या आहेत. १४ दिवस वॉच ठेवताना आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
................
कोट बॉक्स
अनेक कोरोनाबाधित रुग्णांना सौम्य लक्षणे, कोणताही त्रास जाणवत नाही. आवश्यक त्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. सध्या जवळपास ५०० रुग्णांनी गृृह विलगीकरणाचा पर्याय निवडला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेण्यात येतो.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी