तक्रारीअभावी ५ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:29 PM2020-11-28T12:29:29+5:302020-11-28T12:29:37+5:30
Washim Agriculture News ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी ७२ तासां कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करणे आवश्यक असताना जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
खरीप हंगामातील पिकांना यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. त्यात काढणी पश्चात सोयाबीनचे नुकसान खूप झाले. या पिकासाठी जिल्ह्यातील १४६६३९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पीकविम्यातून भरपाई करण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना ७२ तासांत ऑनलाईन पोर्टलवर किंवा ऑफलाईन पद्धतीने कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ११५९४ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नुकसान झाल्याबाबत कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत.
नुकसानाचे ९३ टक्के पंचनामे
जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी पीकविमा मिळण्यासाठी ११५०४ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर पीकविमा कंपनीकडून नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाभरात १०३ प्रतिनिधींची नियुक्ती केली. या प्रतिनिधींनी गावागावात पोहोचत पंचनाम्यांना वेग दिला. तथापि, तांत्रिक अडचणींमुळे आजवर ९३ टक्केच पंचनामे होऊ शकले.
पीकविमा भरणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. या संदर्भात १४६५३९ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. निकषानुसार त्यांनाच पीकविम्याचा लाभ मिळेल.
-शंकर तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम