कर्जमुक्तीबाबतचे ५० हजार अर्ज मुख्यमंत्र्यांना पाठविणार!
By Admin | Published: June 1, 2017 01:12 AM2017-06-01T01:12:10+5:302017-06-01T01:12:10+5:30
रिसोड : पीककर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्जमुक्त होणार’ अभियान राबविल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : पीककर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्जमुक्त होणार’ अभियान राबविल्या जात आहे. या अभियानांतर्गत रिसोड-मालेगाव मतदारसंघातून किमान ५० हजार शेतकऱ्यांचे पीककर्जमाफीचे अर्ज मुख्यमंत्र्यांना पाठविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी बुधवारी दिली.
गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळाली नाही. सततची नापिकी अणि शेतमालाला अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतकरी वेळेच्या आत कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. परिणामी, शेतकरी कर्जबाजारी झाले. शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी कर्जमाफी आवश्यक आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे प्रभावीपणे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे ‘मी कर्जमुक्त होणार’ अभियान राज्यभर राबविले जात आहे. वाशिम जिल्ह्यातही सदर अभियान राबविले जात असून, रिसोड व मालेगाव मतदारसंघात अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन अर्ज भरून घेतले जात आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूळकर, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, सेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात जवळपास ५० हजार शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीबाबतचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. आतापर्यंत १० हजारावर अर्ज भरून घेतले आहेत. या अर्जामध्ये शेतकऱ्यांचे नाव, थकित कर्ज यासह अन्य माहिती भरून घेतली जात असल्याचे सानप यांनी सांगितले.