जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत ५१ तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 12:17 PM2021-06-16T12:17:13+5:302021-06-16T12:17:30+5:30
Mahatma Fule Janaarogya Yojana : ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीबाबत गत वर्षभरात ५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
राज्य शासनाने २०१२ मध्ये राजीव गांधी नावाने आणि आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३ शासकीय आणि ९ खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे. या योजनांची माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना आहेत. अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित रुग्णालयानेसुद्धा विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णालयातील आरोग्य मित्रांनी योजनांची तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना देणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत कोविड-१९ वरील उपचारासाठी २० पॅकेजेस व म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी १९ पॅकेजेस उपलब्ध आहेत.
गत वर्षभरात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आरोग्य विभागाला ५१ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे कार्यवाही सुरू आहे.
या योजनांची माहिती रुग्णांना देण्यासाठी सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या अनुषंगाने १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ५१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यापैकी ३६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर १५ तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.
- डॉ.रणजित सरनाईक
जिल्हा समन्वयक, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना