एप्रिल अखेर नुकसानभरपाईसाठी ५.१४ कोटींचा निधी
By दिनेश पठाडे | Published: June 7, 2023 06:17 PM2023-06-07T18:17:47+5:302023-06-07T18:18:17+5:30
...अखेर नुकसानभरपाईसाठी ५ कोटी १४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
वाशिम : जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानानंतर वेळो वेळी शासनस्तरावर निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शासनाकडून निधी मंजूर केला जात आहे. मार्च महिन्यात व ७ आणि ९ एप्रिल रोजी झालेल्या नुकसानभरपाईचा निधी यापूर्वीच जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता एप्रिल अखेर नुकसानभरपाईसाठी ५ कोटी १४ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे पीक नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या टप्प्यात यापूर्वी निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ ते ३० एप्रिल यादरम्यान झालेल्या नुकसान म्हणून शासनाने निधी मंजूर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे २९७३.५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ५ हजार २२ शेतकऱ्यांना फटका बसला होता. पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले होते. शासन निकषानुसार या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहवाल पाठविला होता. त्यानुसार निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी लवकरच वर्ग केला जाणार आहे. दरम्यान, त्यानंतर झालेल्या नुकसानभरपाईचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला असून निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्यात आले.
मदतीचा निधी वळता करु नये
बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानप्रमाणात रक्कम जमा केली जाते. काही बँका ही रक्कम कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करण्याची शक्यता असते. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खाते व अन्य वसुलीसाठी वळता करु नये, अशा सूचना जिल्हाधिकारी श्णमुगराजन एस. यांनी बँकांना दिल्या आहेत.