बियाणे, खतांचे ५२ नमुने अप्रमाणित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:28 AM2020-08-04T11:28:22+5:302020-08-04T11:28:49+5:30
बियाण्यांचे ४८ व खताचे ४ असे एकूण ५२ नमुने अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात बियाणे व खतांचे नमुने घेण्याची मोहीम राबविली असून, ३१ जुलैपर्यंत बियाण्यांचे १७७ आणि खतांचे ६६ नमुने काढण्यात आले. यापैकी १९८ नमुने तपासले असून, बियाण्यांचे ४८ व खताचे ४ असे एकूण ५२ नमुने अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. एकूण ३८ प्रकरण न्यायालयात दाखल केले असून, पाच प्रकरणे न्यायालयात दाखल करण्याची तयारी कृषी विभागाने चालविली आहे.
जिल्हा परिषद कृषी विभाग तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या भरारी पथकांमार्फत जिल्ह्यातील बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचे नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सहाही तालुका स्तरावर भरारी पथके गठित केली असून, या भरारी पथकांमार्फत बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने घेतले जात आहेत. भरारी पथकांमार्फत ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशकांची दुकाने आणि गोदामांमधून बियाण्यांचे १७७ आणि खतांचे ६६ नमुने घेण्यात आले. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. घेण्यात आलेले बियाणे व खतांचे नमुने जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. बियाण्यांचे १३८ अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ९० प्रमाणित तर ४८ अप्रमाणित आढळून आले. खतांचे ६० अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी ५६ प्रमाणित तर ४ अप्रमाणित आढळून आले.
यापुढेही तपासणी मोहिम सुरूच राहणार
शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहिम सुरूच राहणार आहे. विविध कंपन्याचे बियाणे, खते प्रमाणित आहे की नाही याची पडताळणी केली जाते. अप्रमाणित नमुने आढळून आल्यानंतर, या नमुन्यातील बियाणे पेरणीसाठी कुण्या शेतकऱ्यांना विक्री केले आहे का? याची माहितीही घेतली जात आहे. खताचे नमुने अप्रमाणित आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे.
खते, किटकनाशकसंदर्भात शेतकºयांची फसगत होऊ नये म्हणून दर्शनी भागात माहितीपत्रक लावण्याच्या सूचना कृषी सेवा केंद्रांना दिलेल्या आहेत. किटकनाशक फवारणी करताना शेतकºयांनी दक्षता बाळगावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले.
खते, बियाने नमुने तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेकडे नमुने पाठविल्यानंतर बियाण्यांचे ४८ तर खताचे ४ असे एकूण ५२ नमुने अप्रमाणित आढळून आले. एकूण ३८ प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहेत.
- विकास बंडगर
कृषी विकास अधिकारी
जिल्हा परिषद वाशिम